@maharashtracity

नवीन टेंडर न काढता जुन्याच कंत्राटदारांकडून डेस्कबेंच खरेदी

मुंबई: मुंबई महापालिकेच्या (BMC) शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, मुंबई महापालिकेने त्यापूर्वीच शालेय डेस्कबेंच खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे.

जुन्याच दोन कंत्राटदारांकडून ११ सीबीएसई व १ आयसीएसई बोर्डाची शाळा अशा एकूण १२ शाळांतील इयत्ता १ ली ते ६ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ८८ लाख रुपये खर्चून १६०० डेस्कबेंचची खरेदी करण्यात येणार आहे. (BMC to procure desk benches from previous contractors)

त्यासाठी पालिकेने नव्याने टेंडर प्रक्रिया केलेली नाही. यापूर्वीही पालिकेने इयत्ता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ५ कोटी ७५ लाख रुपयांच्या १० हजार ७९४ डेस्कबेंचची खरेदी करण्यात आली होती. त्यामुळे आता याच कंत्राटदारांना पालिकेकडून एकूण डेस्कबेंच खरेदीसाठी तब्बल ६ कोटी ६४ लाख १३ हजार ४७४ रुपये मोजण्यात येणार आहेत.

यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. मात्र नवीन टेंडर न काढता जुन्याच कंत्राटदाराकडून
या डेस्कबेंचची खरेदी करण्यात येणार असल्याने विरोधी पक्ष व पहारेकरी भाजपकडून या प्रस्तावावर आक्षेप घेतला जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

मुंबई महापालिकेने इंग्रजी माध्यमाकडे पालकांचा असलेला ओढा पाहता सीबीएसई शाळा नव्याने सुरू केल्या आहेत. ११ सीबीएसई शाळा आणि १ आयसीएसई बोर्डाची शाळा अशा एकूण १२ शाळा सुरू केल्या आहेत.

त्यामध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पालिकेने इयत्ता १ ली ते २ री च्या विद्यार्थ्यांसाठी ‘ऐ’ टाईपचे ३,०३१ डेस्कबेंच प्रत्येकी ४,७७० रुपये दराने १,४४, ५७, ८७० रुपये किंमतीची आणि इयत्ता ७ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यासाठी ३,१९६ बेंच प्रत्येकी ५,८५० रुपये दराने १,८६,९६,६०० रुपये किंमतीची एकूण ३, ३१, ५४,४७० रुपये किंमतीचे बेंच खरेदी केली आहे.

तसेच, इयत्ता ३ री ते ४ थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी २,१७४ बेंच प्रत्येकी ५,२११ रुपये दराने १,१३,२८,७१४ रुपये किमतीचे बेंच आणि इयत्ता ५ वी ते ६ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी २,३९३ बेंच प्रत्येकी ५,४५० रुपये दराने १,३०,४१,८५० रुपये किंमतीची एकूण १०,६६१ बेंचची खरेदी २,४३,७०,५६४ किंमतीचे बेंच खरेदी करण्यात आले आहेत.

एकूण १६,८८८ बेंचची खरेदी एकूण ५,७५,२५,०३४ रुपये खर्चून करण्यात आली आहे.

आता पुन्हा इयत्ता १ ली ते २ री च्या विद्यार्थ्यांसाठी ‘ऐ’ टाईपची ८०० बेंचची खरेदी प्रत्येकी ४,७७० रुपये दराने एकूण ४१,९७,६०० रुपये ( १०% पर्यवेक्षण आकारासह) किंमतीत खरेदी करण्यात येणार आहेत. तर इयत्ता ३ री ते ४ थी च्या विद्यार्थ्यांसाठी ४०० बेंच प्रत्येकी ५,२११ रुपये दराने २०,८४,४०० रुपये किंमतीत खरेदि करण्यात येणार आहेत.

तसेच, इयत्ता ५ वी ते ६ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ४०० बेंच प्रत्येकी ५,४५० रुपये दराने २१,८०,००० रुपये किमतीत खरेदी करण्यात येणार आहे. एकूण १,६०० बेंचची खरेदी ८८ लाख ८८ हजार रुपये (१०% पर्यवेक्षण आकारासह) किमतीत खरेदी करण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here