@maharashtracity
मुंबई: मालाड, मालवणी येथे बुधवारी रात्री उशिराने एक दुमजली घर शेजारील घरावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत १८ जण जखमी झाले. त्यांपैकी गंभीर जखमी ११ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये, ३ ते १५ वयोगटातील ८ मुलांचा, २ महिला व १ पुरुष यांचा समावेश आहे. तर उर्वरित ७ जखमींमध्ये , ४ पुरुष आणि ३ महिला यांचा समावेश असून त्यांना नजीकच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या जखमींपैकी एका महिलेची प्रकृती गंभीर आहे. तर उर्वरित सहा जणांची प्रकृती स्थिर आहे. मात्र कोसळलेल्या घराचा ढिगारा उपसण्याचे काम सकाळी उशिरापर्यंत सुरू होते.
प्राप्त माहितीनुसार, मालाड, मालवणी, अब्दुल हमीद रोड, मालवणी गेट नंबर ८, न्यू कलेक्टर कंपाउंड, प्लॉट नंबर ७२ या ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्या जागेत असलेल्या झोपडपट्टीतील एक दुमजली घर शेजारील घरावर बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास अचानक कोसळले. या दुर्घटनेत एकूण १८ जण ढिगाऱ्यामध्ये अडकले होते. घर कोसळताच मोठा आवाज झाला. त्याबरोबर आजूबाजूचे लोक धावत घटनास्थळी पोहचले. मात्र तोपर्यंत घराची मोठी पडझड झाली होती. मात्र स्थानिक नागरिकांनी तात्काळ बचावकार्य हाती घेतले आणि शक्य होईल तेवढ्या जखमींना नजीकच्या डॉ. आंबेडकर रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
तर घर दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचवकार्य सुरू करीत काही जखमींना ढिगाऱ्यामधून बाहेर काढले.
मात्र १८ पैकी ३ ते १५ वयोगटातील ८ मुलांसह ११ जणांचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर उर्वरीत ७ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी मरीकुमारी हिरांगणा (३०) या जखमी महिलेची प्रकृती गंभीर आहे.
दरम्यान, घर दुर्घटना झालेल्या ठिकाणीच शेजारील तळमजला अधिक तीन मजली घरही धोकादायक स्थितीत आहे.
मृतांची नावे -:
(१) साहिल सर्फराज सय्यद (मुलगा/ ९)
(२)आरिफा शेख ( मुलगी/८)
(३)जोहन इरराना (मुलगा / १३)
(४) ४० वर्षीय व्यक्ती ( नाव माहीत नाही)
(५) १५ वर्षीय मुलगा ( नाव माहीत नाही)
(६)८ वर्षीय मुलगी ( नाव माहीत नाही)
(७) ३ वर्षीय मुलगी ( नाव माहीत नाही)
(८ ) ५ वर्षीय मुलगी ( नाव माहीत नाही)
(९) ३० वर्षीय महिला ( नाव माहीत नाही)
(१०)५० वर्षीय महिला (नाव माहीत नाही)
(११) ८ वर्षीय मुलगा ( नाव माहीत नाही)
७ जण जखमी – नावे
(१) मरीकुमारी हिरांगणा ( महिला ३० गंभीर)
(२)धनलक्ष्मी ( महिला / ५६)
(३)सलीम शेख (पुरुष / ४९)
(४)रिझवाना सय्यद (महिला /३५)
(५)सुर्यमणी यादव ( पुरुष / ३९)
(६) करीम खान ( पुरुष /३०)
(७) गुलजार अहमद अन्सारी ( पुरुष / २६)
