स्वप्नील लोणकरप्रमाणे आम्हीही निराश आहोत! 

@maharashtracity

मुंबई: सेवाकाळात कुटुंबियांपासून घरापासून लांब, आदिवासी-नक्षलग्रस्त भागात काम करत असल्याने आंदोलन करू शकत नाही. निव्वळ २४ हजारावर वेठबिगाऱ्याप्रमाणे राबणे, मानधन वाढ मंजुरी असताना देखील अंमलबजावणी नाही. अशी परिस्थिती असल्याने ग्रामीण भागात काम करणारे मानसेवी डॉक्टरदेखील आत्महत्या करण्याच्या तयारीत आहेत.

तसे पत्र या डॉक्टरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. स्वप्नील लोणकरसारखे आम्ही पुरते निराश असून स्वप्नील लोणकर (Swapnil Lonkar) प्रमाणे आत्महत्या करण्यास परवानगी द्यावी, (doctors seek permission to commit suicide) असे पत्र आरोग्य विभागांतर्गत आदिवासी जिल्ह्यातील दुर्गम अतिदुर्गम भागात काम करणाऱ्या २८१ मानसेवी डॉक्टरांनी पाठवले आहे.

दरम्यान, हे बीएएमएस डॉक्टर १६ आदिवासी जिल्ह्यात तसेच नक्षलग्रस्त दुर्गम भागातील रुग्णसेवा करत आहेत. गरोदर माता तसेच कुपोषित बालकांच्या आरोग्य तपासणीपासून किरकोळ आजार, साप- विंचू दंशापासून वेगवेगळ्या आजारांवर उपचार करतात.

गडचिरोली (Gadchiroli) सारख्या नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या पोलीस वा अन्य शासकीय कर्मचाऱ्यांना विशेष प्रोत्साहन भत्ता दिला जातो. मात्र मानसेवी डॉक्टरांना वेठबिगारासारखे २४ हजार रुपये मानधनावर राबावे लागत असल्याची व्यथा या २८१ डॉक्टरांच्या भरारी पथकातील डॉ शेषराव सुर्यवंशी यांनी व्यक्त केली.

करोनाच्या गेल्या दीड वर्षात गाव खेड्यातील करोनाबाधित रुग्णांसाठी हे डॉक्टर रुग्णसेवा करत आहेत. १० महिन्यांपूर्वी सप्टेंबरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) व आदिवासी मंत्र्यांकडील बैठकीत आदिवासी जिल्ह्यात काम करणाऱ्या भरारी पथकाच्या २८१ डॉक्टरांचे मानधन २४ हजार रुपयांवरून वाढवून ४० हजार करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आजतागायत निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही.

आरोग्य विभागात (health department) डॉक्टरांची हजारो पदे रिकामी आहेत. दुर्गम आदिवासी जिल्ह्यात काम करण्यासाठी ‘एमबीबीएस’ डॉक्टर फिरकतही नाहीत, अशावेळी दोन दशकांपासून हंगामी काम करणाऱ्या या डॉक्टरांना सेवेत कायम करायला सरकार तयार नसल्याचे या भरारी पथकाच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे.

यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना मे महिन्यात पत्र लिहून आत्महत्या करायला परवानगी मागितली असल्याचे डॉ राजन तडवी यांनी सांगितले. दुर्गम भागातील रुग्णांचा विचार करून आंदोलनही करता येत नाही. सध्या आरोग्य विभाग १८ हजार रुपये तर आदिवासी विभाग ६ हजार असे २४ हजार रुपये असे मिळून मानसेवी डॉक्टरांना मानधन देण्यात येते. १० महिन्यापूर्वी ४० हजार मानधनवाढीचा निर्णय घेऊनही सरकार अंमलबजावणी करणार नसेल तर या डॉक्टरांनी करायचे काय असा सवाल डॉ अरुण कोळी यांनी केला आहे.

घरादारापासून दूर राहून रुग्णसेवा करताना मुलाबाळांची व आई-वडिलांची जबाबदारी कशी सांभाळायची असा सवाल विचारत आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here