@maharashtracity

मुंबई: कुर्ला (प.) स्टेशन रोड परिसरात मंगळवारी दुपारच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे एका लाकडी चाळीत अचानकपणे लागल्याची घटना घडली. या आगीची नजीकच्या बेकरीला कमी मात्र एका मेडिकलला जास्त झळ बसली आहे. या आगीतून स्थानिक रहिवाशी बचावले आहेत.

आग विझविताना अग्निशमन दलाचे सहाय्यक केंद्र अधिकारी यशवंत नाचरे हे किरकोळ जखमी झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. यासंदर्भातील माहिती , काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक आश्रफ आजमी यांनी महाराष्ट्रसिटी च्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

कुर्ला रेल्वे स्टेशन (पश्चिम), पाईपरोड, मोरेश्वर पाटणकर शाळा, कुर्ला पोलीस स्टेशन लेन येथे एका लाकडी चाळीत मंगळवारी दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास वीज मिटरच्या ठिकाणी शॉर्टसर्किट होऊन आग लागली. थोड्याच अवधीत ही आग पसरली. आगीचा भडका व काळाकुट्ट धूर पाहता ही आग काहिशी भीषण स्वरूपाची वाटत होती.

या आगीची खबर मिळताच चाळीतील नागरिकांमध्ये काहीशी भीती निर्माण झाली. या रहिवाशांना स्थानिकांनी आणि अग्निशमन दलाने लगेचच सुरक्षित स्थळी नेऊन त्यांचे प्राण वाचवले.

अग्निशमन दलाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन फायर इंजिन, वॉटर टँकर यांच्या सहाय्याने या आगीवर दोन तासांनी नियंत्रण मिळवले व आग विझवली. मात्र ही आग विझविताना अग्निशमन दलाचे सहाय्यक केंद्र अधिकारी यशवंत नाचरे हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

ही आग का आणि कशी काय लागली, याबाबत स्थानिक पोलीस, अग्निशमन दलाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here