भोपाळ
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे, येथे एका मधमाशीमुळे २२ वर्षीय मजुराचा मृत्यू झाला. पाणी पित असताना त्याने मधमाशी गिळली. मधमाशीने अन्न नलिका आणि जीभेवर डंख दिल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याना रुग्णालयात उलटी आली, त्यावेळी मधमाशीही बाहेर आली.
मिळालेल्या माहितीनुसार, बैरसिया पोलिसांना सरकारी रुग्णालयातून फोन आला होता. यात एका तरुणाच्या मृत्यूबाबत सांगण्यात आले होते. सूचना मिळताच पोलीस रुग्णालयात पोहोचले. येथे तपासादरम्यान लक्षात आले की, मृत तरुणाचं नाव हिरेंद्र सिंग असून तो २२ वर्षांचा होता. पोलिसांनी जेव्हा कुटुंबीयांकडे चौकशी केली त्यानुसार, ही घटना ६ डिसेंबरची आहे. त्या रात्री हिरेंद्र जेवण करून पाणी प्यायला गेला. अंधारात पाण्यात काय आहे हे त्याच्या लक्षात आलं नाही. थोड्या वेळानंतर त्याला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मधमाशीने त्याच्या अन्न नलिकेला दंश केला होता. यामुळे अन्न नलिकेला सूज आली होती. सरकारी रुग्णालयात दाखल केल्यानंतरही त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही, तेव्हा त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.