@maharashtracity

कोरोना नियमांमुळे नाट्यगृहात, मोठ्या सभागृहात पालिका सभा होण्याची शक्यता

कालिदास, दीनानाथ नाट्यगृह व अण्णाभाऊ साठे महामंडळ सभागृहाची चर्चा

प्रत्यक्ष सभा घेण्यास महापौर अनुकूल व भाजपही आग्रही

दादर येथील स्वामी नारायण मंदिरातील योगी सभागृह, षण्मुखानंद सभागृह पर्याय

मुंबई: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबई महापालिकेची (BMC) शेवटची प्रत्यक्ष सभा १७ मार्च २०२० रोजी पार पडली होती. तेव्हापासून ते आजपर्यंत लॉकडाऊनमुळे पालिकेच्या सभा ऑनलाइन झाल्या. आता कोरोनाचा (corona) प्रादुर्भाव कमी झाल्याने २२ नोव्हेंबरपासून म्हणजे २० महिन्यांनंतर पालिकेची पहिली सभा प्रत्यक्ष घेण्याचा पालिका प्रशासन व महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांचा विचार आहे.

भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे (BJP group leader Prabhakar Shinde) यांनीही, महापौरांना पत्र पाठवून ५०० आसनक्षमता असलेल्या नाट्यगृहात, सभागृहात सभा घेण्याची मागणी केली आहे.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव जरी काही प्रमाणात कमी झालेला असला तरी कोरोना अद्यापही हद्दपार झालेला नाही. त्यामुळे कोरोना नियम पाहता मुलुंड येथील कालिदास नाट्यगृह (Kalidas Auditorium, Mulund), पार्ले येथील दीनानाथ नाट्यगृह (Dinanath Auditorium, Parle) आणि अण्णाभाऊ साठे (Annabhau Sathe) महामंडळाचे सभागृह असे तीन जागेचे पर्याय पालिकेसमोर आहेत.

आणखीन काही पर्यायांमध्ये किंग्जसर्कलचे षण्मुखानंद सभागृह (Shanmukhanand Auditorium) व दादर स्वामी नारायण मंदिरातील (Swami Narayan Temple, Dadar) योगी सभागृह देखील पर्यायी ठरू शकतात. मात्र महापौर किशोरी पेडणेकर यांची भूमिका निर्णायक असणार आहे. त्या पार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात सभा घेण्यास अनुकूल असल्याचे समजते.

मुंबई महापालिकेत सर्वपक्षीय निर्वाचित नगरसेवकांची संख्या २२७ व ५ नामनिर्देशित नगरसेवक असे २३२ नगरसेवक, पालिका चिटणीस विभागाचे अधिकारी, पालिका आयुक्त किंवा अतिरिक्त आयुक्त, इतर महत्वाच्या विभागाचे अधिकारी आदींना एक आसन सोडून दुसऱ्या आसनावर बसण्याची व्यवस्था पालिकेला करावी लागणार आहे.

भाजप प्रत्यक्ष सभा घेण्याची मागणी वारंवार करीत आहे. त्यासाठी महापौरांना आजही भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी पत्र पाठवून प्रत्यक्ष सभेची पुन्हा एकदा मागणी केली आहे. महापालिकेच्या शेवटच्या टप्प्यातील नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी शेवटच्या तीन महिन्यातील होणाऱ्या बैठकीतील महत्वाच्या विषयावर साधक बाधक चर्चा होण्यासाठी प्रत्यक्ष सभा घेणे आवश्यक आहे.

उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) निर्देशानुसार राज्य शासनाने दिलेले आदेश आणि आमचे हे पत्र या उपरही आपण प्रत्यक्ष सभा न घेतल्यास त्यातून काही विषय आपणास साधक बाधक चर्चेविना मंजूर करायचे असावेत, असा अर्थ ध्वनित होईल, असे भाजपचे प्रभाकर शिंदे यांनी सदर पत्रात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here