@maharashtracity

अस्थींचे दर्शन घेण्यासाठी चाहत्यांची गर्दी

मुंबई: लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे बंधू पं. हृदयनाथ मंगेशकरांचे पुत्र आदीनाथ यांनी दीदींच्या अस्थी ताब्यात घेतल्या. सोमवारी सकाळी लतादीदींच्या अस्थी कलश प्रभूकुंजवर आणण्यात आला. या अस्थींचे दर्शन घेण्यासाठी सोमवारी देखील चाहत्यांनी गर्दी केली होती.

दरम्यान, भारतरत्न लता मंगेशकर यांना रविवारी शिवाजी पार्क येथे हजारोंच्या अश्रुपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी देशातील दिग्गजांनी शिवाजी पार्क येथे येत दीदींना आदरांजली वाहिली.

दरम्यान, सोमवारी रात्री उशिरापर्यंत लतादीदींच्या चाहत्यांनी त्यांच्या दर्शनासाठी तसेच अंत्यसंस्कारासाठी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर सोमवारी सकाळी पेडर रोडवरील दीदींच्या निवासस्थानी प्रभुकुंज वर दीदींच्या अस्थी आणल्यावरही दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली असल्याचे सांगण्यात आले.

शिवाजी पार्कात दीदींचे स्मृतीस्थळ उभारा

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या ठिकाणी त्यांचे स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी भाजपचे आमदार राम कदम (BJP MLA Ram Kadam) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. लता दिदींचे हे स्मृतीस्थळ जगासाठी प्रेरणा देणारे ठरेल, असे राम कदम यांनी म्हटले आहे.

लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात मुंबईतील शिवाजी पार्क दादर (Shivaji Park, Dadar) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे याच जागेवर पार्कात लतादीदींचे स्मृतीस्थळ उभारावे आणि त्यांच्या स्मृती कायमस्वरुपात जतन कराव्यात. जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमी आणि लतादीदींच्या चाहत्यांच्या वतीने मी ही विनंती करत असल्याचे, राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here