By सदानंद खोपकर

@maharashtracity

मुंबई: बीड जिल्हा पोलीस अधीक्षक (Beed SP) यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (HM Dilip Walse-Patil) यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचना उत्तरात केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात भरदिवसा झालेला गोळीबार, महिलांवरील अत्याचार, अवैध धंदे, चोरी, दरोडे, बँकामधील आर्थिक गैरव्यवहार, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात पोलीस अधीक्षकांना आलेले अपयश अशा प्रश्‍नांविषयी विधानसभेत आज लक्षवेधीवर चर्चा करतांना भाजप (BJP) सदस्यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.

गृहमंत्री म्हणाले, येत्या १५ दिवसांत वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याद्वारे चौकशी करून दोषी पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात येईल. गेल्या काही दिवसांमध्ये बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी स्वरूपाच्या घडामोडींमध्ये वाढ झाली आहे. हत्या, बलात्कार, प्राणघातक हल्ले, गोळीबार त्यासमवेतच वाळू माफियांच्या कारवाया आणि जिल्ह्यातील मशीद आणि देवस्थानच्या भूमी बळकावल्याची अनेक प्रकरणे यामुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावेळी केली.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, जिल्हाधिकारी कार्यालयावर झालेल्या गोळीबार प्रकरणात जे घायाळ झाले, त्यांच्यावरच गुन्हे का नोंद केले, त्याची चौकशी करण्यात येईल. माफियांवर कठोर कारवाई केली जाईल. मात्र कोणत्याही वाळू माफियाला अटक केल्यानंतर त्याला सोडवण्यासाठी आमदारांनी मला दूरभाष करू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.

भाजपच्या आमदारांचा विधानसभेत गोंधळ !

विधानसभेत आमदार नमिता मुंदडा यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांवर गृहमंत्र्यांनी काहीच उत्तर न दिल्याने भाजपच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षासमोरील जागेत येऊन सभागृहात गोेंधळ घातला. त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले , आमदार मुंदडा यांनी वारंवार दूरभाष करूनही पोलीस अधिकार्‍यांनी त्यांचा दूरभाष उचलला नसल्याचे निदर्शनास आल्याचे चौकशीत स्पष्ट झाले, तर अशा पोलीस अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here