@maharashtracity

सार्वजनिक आरोग्य खात्याकडून एकही रुग्ण नसल्याचे स्पष्टीकरण
विषाणूंच्या संसर्गाबद्दल सर्वेक्षण सुरू

मुंबई: राज्यात वटवाघुळांमधून (bats) पसरणाऱ्या निपाह (Nipah virus) या आजाराचा एकही रुग्ण अद्यापपर्यंत आढळला नसल्याचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने (public health department) सोमवारी स्पष्ट केले. मात्र, निपाह विषाणूंच्या संसर्गाबद्दल सर्वेक्षण सुरू असल्याचे देखील सांगण्यात आले.

दरम्यान, देशात कोरोना विषाणूंचा उद्रेक सुरू असताना पुणे जिल्ह्यात झिका विषाणूंचा (Zika virus) संसर्गाचा एक रुग्ण आढळला. या विषाणूंबरोबरच केरळमध्ये (Kerala) निपाह या विषाणूंच्या संसर्गाने एका मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली.

या पार्श्वभूमिवर राज्यात निपाह विषाणूंचे सर्वेक्षण सुरू असल्याचे सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे सांगण्यात आले. आतापर्यंत एकही रुग्ण आढळलेला नाही.

महाराष्ट्रात निपाह विषाणू सापडल्याचे संशोधन ‘राष्ट्रीय विषाणू संस्था’मधून (NIV) पुढे आले आहे. महाबळेश्वर (Mahabaleshwar) येथे केलेल्या वटवाघुळांच्या अभ्यासातून हा निष्कर्ष निघाला. त्या बाबतचा शोधनिबंध ‘जर्नल ऑफ इन्फेक्शन अँण्ड पब्लिक हेल्थ’ (Journal of Infection and Public Health) या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.

महाबळेश्वरमधील वटवाघुळांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. त्यापैकी ३३ वटवाघुळांमध्ये निपाह विषाणूंच्या विरोधातील प्रतिपिंडे (antibodies) तयार झाल्याचे दिसले. एका वटवाघुळात निपाहचा संसर्ग झाल्याचेही स्पष्ट झाले.

केरळमध्ये २०१८ मध्ये याचा उद्रेक झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एका मुलाचा मृत्यू निपाह विषाणूंच्या संसर्गामुळे झाला. त्यामुळे राज्याचे सार्वजनिक आरोग्य खात्याने या बाबतचे सर्वेक्षण सुरू केले आहे.

निपाह आजारात ताप, डोकेदुखी, घसादुखी आणि श्वास घेण्यास अडथळा निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान यावर बोलताना राज्य आरोग्य विभाग साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, राज्यात आतापर्यंत निपाह विषाणूंचा संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र निपाहचे सर्वेक्षण सुरू आहे.

केरळमध्ये यापूर्वीही निपाहचा उद्रेक झाला होता. त्यावेळीही राज्यात रुग्ण आढळला नव्हता. मात्र, या बाबत सातत्याने सर्वेक्षण सुरू असल्याचे डॉ. आवटे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here