अतिवृष्टी आणि अवेळी पावसामुळे कडधान्य उत्पादनात घट

@maharashtracity

By मिलिंद माने

महाड (रायगड): महाड तालुक्यातील खाडीपट्टा आणि किल्ले रायगड विभागातील नाते परिसरात कडधान्य उत्पादन घेतले जाते. मात्र, यावर्षी झालेली अतिवृष्टी आणि अवेळी पाऊस यामुळे कडधान्य उत्पादनावर परिणाम झाला असून कडधान्य उत्पादनात मोठी घट झाली आहे. तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांना आपली शेती पडीक ठेवावी लागली आहे.

रायगड जिल्हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जातो. जून महिन्यापासून भात पिकाची मशागत लागवड आणि पुढील प्रक्रिया सुरू होते. भात कापणी झाल्यानंतर दलदलीच्या ठिकाणी कडधान्य घेण्यात येते. महाड तालुक्यात राजेवाडीपासून पुढे म्हाप्रळपर्यंत कडधान्य मोठ्या प्रमाणात घेतले जात होते.

खाडीपट्टा विभागातील दादली, सव, गोठे, तुडील, खुटील, महाप्रळ आदी ठिकाणी उत्पादित होणाऱ्या कडधान्याला मुंबईसह अन्य शहरात आजदेखील मागणी आहे. मात्र, या विभागात शेतातील प्रदूषण आणि पावसाचा लहरीपणा यामुळे अनेकांनी कडधान्य घेणे बंद केले आहे. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणावर आलेल्या चिखलाने जमिनीचेदेखील नुकसान झाले. भात शेती या पाण्यात नष्ट झाली आणि कडधान्य पिकदेखील घेणे अवघड होवून गेले.

रायगड जिल्ह्यामध्ये १ लाख १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड केली जाते. खरीप हंगामातील भात पिकानंतर येथील शेतकरी वाल, पावटा, मूग, मटकी, हरभरा व चवळी अशा कडधान्याबरोबरच भुईमूग शेतीदेखील घेतली जाते. गेल्या काही वर्षांमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कडधान्य व भुईमूगसारख्या नगदी पिकांमुळे एक आधार निर्माण झाला आहे.

जिल्ह्यातील अनेक भागातील वाल, पावटा तसेच पोलादपूरमधील मटकी महाड मधील वाल, चवळी अशी कडधान्यांना मोठी मागणी आहे. साधारणपणे दिवाळीपूर्वी भात कापणी पूर्ण होते. मात्र, यावर्षी पडलेला अवेळी पाऊस आणि झालेली अतिवृष्टी यामुळे रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये भात शेतीला मोठा फटका बसला. भात शेतीचे नुकसान झाल्यानंतर शेतकरी कडधान्ये व भुईमूग यासारख्या पिकाकडे आशेने डोळे लावून बसलेला होता.

मात्र, यामध्ये देखील निराशाच झाली. तालुक्यातील वडवली, कोल, कोथेरी, राजेवाडी या भागात पुराच्या पाण्याबरोबर शेजारून गेलेली रासायनिक सांडपाणी वाहिनी फुटून शेतात गेलेल्या रासायनिक सांडपाण्यामुळे शेतकऱ्यांनी कडधान्य घेतले नाहीत. या कडधान्य क्षेत्रावर अमरवेलचे संकट देखील उभे राहिले आहे. अमरवेलला रोखण्यात कृषी विभागाला अद्याप यश आले नसून याबाबत पिक बदल हाच एक उपाय असल्याचे सांगण्यात येत आहे.

भात कापल्यानंतर लगेचच कडधान्य लावली जातात. तर भुईमुगाची लागवड डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात केली जाते. जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये भुईमुगाची लागवड ४०० हेक्टरवर केली जाते. यातून शेतकऱ्यांना तेल तसेच गुरांना पेंड उपलब्ध होते. रायगड जिल्ह्यात १४ हजार हेक्टर क्षेत्रावर कडधान्य पिक घेतले जाते. मात्र यावर्षी झालेली अतिवृष्टी आणि अवेळी पाउस यामुळे शेतकऱ्यांनी कडधान्य पिकाकडे पाठ फिरवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here