By विजय साखळकर

@maharashtracity

अंडरवर्ल्डचा (Underworld) घटक म्हणजे मृत्यू डोक्यावर घिरक्या घेत असतो. राजेंंद्र सदाशिव निकाळजे उर्फ छोटा राजन (Chhota Rajan) उर्फ नाना या घिरक्यांतून सहज पुढे गेला. इंग्रजी भाषेत ज्याला मृत्यूचे चुंबन घेऊन परतणे असे‌ म्हणतात.

गेल्या आठवड्यात छोटा‌ राजन याचा एम्स (AIIMS) इस्पितळात कोरोनावरील उपचार दिले जात असता मृत्यू ओढवल्याच्या बातम्या सोशल मीडियावर वायरल झाल्या. नंतर काही तासांनी एम्सकडून पत्रक काढून छोटा राजनवर कोरोना आजारावरील उपचार सुरू असल्याचे स्पष्ट केले गेले.

छोटा राजन संबंधातील मृत्यूची बातमी प्रकट होण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी २१ वर्षांपूर्वी छोटा राजन याचा बॅंकाॅक (Bangkok) शहरात प्रतिस्पर्धी गटाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची. बातमी अगदी रामप्रहरी सर्वच वृत्तवाहिन्यावरून प्रक्षेपित झाली होती. पण तासाभरानं तो जिवंत असल्याचे व स्मितिवेज या नामांकित इस्पितळात उपचार घेत असल्याचं उघड झालं.नेमकं काय झालं होतं?

छोटा राजन बॅंकाॅकमध्ये राहत असल्याची माहिती त्याच्याच टोळीतील शेट्टी नावाच्या फितूर सदस्यांकडून प्रतिस्पर्धी टोळीचा म्होरक्या छोटा शकील (Chhota Shakeel) याला मिळाली आणि त्यानं छोटा राजनला ठार करण्यासाठी नेमलेल्या मुन्ना झिंगाडा याला ती दिली. त्यानं आपल्या साथीदारांसह हल्ला केला व त्या छोटा राजन मारला गेल्याची बातमी प्रकट झाली.

छोटा राजन आणि रोहित वर्मा हे दोघंही त्या ठिकाणी होते. फुटलेल्या शेट्टीला भेटीसाठी बोलावलं होतं. बेल वाजल्यावर तो आला असं समजून ‌ रोहितनं दार उघडलं आणि गोळीबारात तो ठार झाला. त्याला सावरण्यासाठी गेलेली त्याची पत्नीही मृत्यू पावली. प्रसंगावधान राखून छोटा राजन मात्र रोहितच्या छोट्या मुलाला घेऊन खिडकीतून छपरावर व नंतर जखमी अवस्थेत इस्पितळात दाखल झाला. त्यामुळे छोटा राजन जिवंत असल्याचे नवे वृत्त बाहेर आले.

या दोन गैरसमजातील मृत्यूच्या बातम्या सोडल्या तर दोन वेळा छोटा राजन मृत्यूच्या अगदी जवळपास जाऊन आला होता. १९९३ साली दाऊद इब्राहीमनं आयएसआयकडून (ISI) आखल्या गेलेल्या बाॅम्बस्फोट (bomb blast) प्रकरणात आपले नेटवर्क पुरवले, म्हणून राजनने त्याच्याशी पंगा घेतला व तो दाऊदपासून (Dawood Ibrahim) फुटला अशा बातम्या होत्या. पण त्या काळात थापाच्या हत्त्येमुळे दाऊद राजन यांच्यात बेबनाव निर्माण झाला होता, असं पोलिस सांगत होते.

त्या सुमारास छोटा राजन यानं एकाएकी दुबई (Dubai) सोडली आणि तो मलेशियाची (Malaysia) राजधानी कौलालंपूर (Kuala Lumpur) जवळच्या सागरी हद्दीत एका याचमध्ये (सर्व सुखसोयी असणारे जहाज) राहत होता.

छोटा राजननं दुबई का सोडली?

त्या सुमारास एका इंग्रजी नियतकालिकांतून एक तपशील प्रकाशित झाला होता…. त्यात असे म्हटले होते की दाऊदने छोटा राजनला भेटायला बोलावलं होते. तो भेटीच्या ठिकाणी जाण्यास निघाला. त्यवेळी त्याला एक फोन आला. त्यानंतर छोटा राजन तेथून थेट मलेशियात गेला. कारण फोनवर त्याला कळाले की दाऊद त्याला पोटला पध्दतीने मारणार आहे. ही पोटला पद्धत काय असते? राजनला फोन करणारा कोण होता?

राजनला फोन करणारा दाऊदच्या अत्यंत जवळचा माणूस होता. पोटला पद्धत म्हणजे ठार मारायचे आणि शरीराचे तुकडे करून एका पोत्यात, पेटीत, खोक्यात … कशातही भरून जमिनीखाली पुरून टाकायचे.

या पलायनामुळे राजन वाचला. पण त्यानंतर त्याला शरदण्णा शेट्टीकरवी याचला घेरून मारण्याचा प्रयत्न झाला. पण यावेळी संतोष शेट्टी या राजनच्या हस्तकानं गोळ्या सुटू लागताच जहाजावरील दिवे बंद केले आणि राजनला एका छोट्या होडक्याच्या मदतीने त्या ठिकाणाहून दूर नेला. त्यामुळे छोटा राजन वाचला. स्वत: संतोष शेट्टीनं ही माहिती गुप्तचर यंत्रणांना त्याच्या अटकेनंतर दिली होती.

हे जाहीर झालेले प्रसंग आहेत. इतरही काही असू शकतील.

(लेखक Vijay Sakhalkar हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्यांनी अनेक वर्षं गुन्हेगारी जगताचे वृत्तांकन केले आहे.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here