गुन्हेगारांचा बिमोड करा – विशेष पोलीस महानिरीक्षकांना सूचना

मुंबई: मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात महिलांवर चोरांकडून होत असलेले हल्ले आणि त्यात महिलांचा होणारा मृत्यू याची गंभीर दखल विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी घेतली आहे. या गुन्हेगारीचा बिमोड करून महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या अशा सूचना डॉ गोऱ्हे यांनी कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते यांना पत्राद्वारे केल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी कळवा रेल्वे स्टेशन येथे विद्या पाटील या मोबाईल चोराचा प्रतिकार करत असताना मृत्युमुखी पडल्या. दुसऱ्या एका घटनेत कन्मीला रायसिंग या रिक्षाने जात असताना त्यांचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न झाला. या झटापटीत खाली पडून डोक्यास मार लागून त्यांचा मृत्यू झाला. तसेच वाडा येथील सुप्रिया गुरुनाथ काळे यांच्या घरी दि. ११ जून २०२१ या रोजी चोरीच्या उद्देशाने आलेल्या अज्ञात गुन्हेगारांनी त्यांचा खून केला.

या तिन्ही घटना बघता महिलांविरुद्ध गुन्हेगारीचे वाढते प्रमाण आढळून येत असल्याचे लक्षात येते. याची दखल घेऊन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कोकण विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते यांना त्वरित कारवाई करण्याच्या पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत.

पत्रात डॅा.गोऱ्हे यांनी म्हटले आहे की, कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस विभागास सतर्क करण्यात यावे, महिलांविरुद्धच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या गुन्हेगारांविरुद्ध तसेच सराईत गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई हाती घेण्यात यावी.

डॉ गोऱ्हे पत्रात असेही नमूद करतात की, ज्यांच्या विरुध्द गुन्हे दाखल आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करून न्यायालयात जामीन मिळू नये यासाठी सरकारी वकिलांच्या माध्यमातून प्रभावी मांडणी करावी.

यागुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीची कारवाई करावी. तसेच १४९ व १०७ अंतर्गत गुन्हा प्रतिबंध होण्याची कारवाई करण्याच्या दृष्टीने विभागातील सर्व क्षेत्रीय अधिकारी यांना सूचित करून उचित कार्यवाही करावी, अशाही सूचना डॉ नीलम गोऱ्हे यांनी पोलीस महानिरीक्षकांना दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here