१४ ऑगस्ट रोजी पहिला टप्यात सुरू होणार
Twitter : @maharashtracity
मुंबई
अंधेरीतील कामगार रुग्णालय लवकरच सेवेत रुजू होणार असल्याची माहिती मिळत आहे. १४ ऑगस्ट रोजी सेवेचा पहिला टप्पा सुरु होणार आहे. नुकतेच कर्मचारी राज्य विमा महामंडळ म्हणजेच ईएसआयसीकडून अंधेरी येथील कामगार रुग्णालयाची पाहणी करण्यात आली. यावेळी यातील सज्ज असलेल्या कक्षांची तसेच इतर सज्जतेची माहिती देण्यात आली. हे रुग्णालय सुरु झाल्यास कामगार बंधूना दिलासा मिळणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे राज्य सचिव भिमेश मुतुला यांनी सांगितले.
दरम्यान कर्मचारी राज्य विमा महामंडळ अधिकाऱ्यांच्या पाहणी दरम्यान रुग्णालयाच्या इमारतीच्या ए तसेच ई विंगच्या तळापासून दुसऱ्या मजल्यापर्यंत ओपीडीचे बांधकाम पूर्ण झाले असल्याचे संघटनेचे भिमेश मुतुला यांनी सांगितले. तर पीजी रुग्णालय आणि कर्मचारी निवासमधील ही काही दुरुस्ती करण्यात आली आहे. तसेच ऑपरेशन थिएटर ब्लॉक आणि आयपीडी ब्लॉक बेसमेंट स्ट्रक्चरचे काम पूर्ण झाले आहे. कामे पूर्णत्वाच्या टप्प्यावर असून सोबत एफएसआय मंजुरी आणि फायर एनओसी मिळवण्यासाठी एमआयडीसीला पत्र देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. इमारतीच्या कामांची पुष्टी करून कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, इलेक्ट्रिक टेक्निशियन, बांधकाम ठेकेदार यांनी खात्री दिली आहे. त्यामुळेच १४ ऑगस्ट २०२३ रोजी पहिला टप्यात ओपीडी सुरू केली जाईल, अशी माहिती कर्मचारी राज्य विमा महामंडळ प्रशासनाने दिली आहे.
“आज पाच वर्ष पूर्ण झाले. यात कर्मचारी राज्य विमा महामंडळ कार्डधारक कर्मचाऱ्यांची वाईट परिस्थिती निर्माण झाली होती. दुसऱ्या बाजूला आम्ही रुग्णालय सुरू करण्यासाठी केंद्राकडे मागोमाग पाठपुरावा करून केंद्रीय मंत्र्यांना दिल्लीत जाऊन भेट घेत कामगारांची व्यथा मांडून हॉस्पिटलच्या तांत्रिकदृष्ट्या अडचणी दूर करून रुग्णसेवेसाठी मार्ग मोकळा करुन देण्यात आला.”
– भिमेश मुतुला, राज्य सचिव, महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना.