Twitter : @NalavadeAnant

मुंबई

भाजप नेत्या पंकजा मुंडे कॉंग्रसमध्ये जाणार अशा चर्चा मागील काही दिवासांपासून राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. एवढेच नव्हेतर पंकजा मुंडेंनी राहुल गांधींची भेट घेतल्याचेही सांगण्यात येत होते. या चर्चांवर शुक्रवारी अखेर पंकजा मुंडे यांनी स्वतःच पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. एखाद्याचे करियर संपवण्याचा हा डाव आहे, असा थेट आरोप त्यांनी यावेळी केला.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, मला शेकडो फोन आले. मला थोडीशी पार्श्वभूमी सांगावी लागेल. २०१९ मध्ये माझा पराभव झाला. त्यानंतर अनेक निर्णय झाले. मी त्यात सामील नसले, मला तिकिट मिळाले नाही म्हणून मी नाराज असेल, म्हणून पक्षाबाहेर जाणार अशा चर्चा झाल्या. मी जाहीर कार्यक्रमातही भूमिका मांडली आहे. सातत्याने मी स्पष्टीकरण दिले. तरी पण माझ्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

……..कायदेशीर नोटीस पाठवणार

वेगवेगळ्या पक्षांकडून मला पक्षात घ्यायला आवडेल, अशा प्रतिक्रिया आल्या. परवा एक बातमी आली की मी राहुल गांधी यांची भेट घेतली. एखाद्याचे राजकीय करियर संपवण्याचा हा डाव आहे, असा थेट आरोपही त्यांनी केला. मी काँग्रेसच्या वाटेवर आहे. माध्यमांवर जबाबदारी आहे. ज्याने कथन केले त्यांच्या विरोधात मी अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार, असा इशाराही त्यांनी दिला.

माझ्यावर गोपीनाथ मुंडे यांचे संस्कार

माझे राजकीय करियर २० वर्षांचे आहे. माझे जनसामन्यांचे नेतृत्व आहे. माझ्यावर गोपीनाथ मुंडे यांचे संस्कार आहेत. पाठीत खंजीर खुपसण्याचे माझ्यावर संस्कार नाही. दरवेळी पंकजा मुंडे यांचे नाव येते व मला तिथे स्थान मिळत नाही. याबाबत माझ्या पक्षाला विचारावे लागेल. जेव्हा जेव्हा माझे नाव चालले, मी कधीही टिप्पणी केली नाही. माझ्या भाषणाचे तुकडे काढले जातात, सोयीचे तेवढेच दाखवले जाते. भागवत कराड यांना संधी दिली, त्यानंतर मीच त्यांच्या यात्रेला भगवा झेंडा दाखवला. मला दोनवेळा फॉर्म भरायला सांगितला. पण नंतर तो भरू नका असे सांगण्यात आले. पण मी जो आपकी आज्ञा म्हणत पक्षाचे आदेश ऐकले, असेही त्यांनी म्हंटले आहे.

राजकारणात येण्याचे माझे मूळ काय? पंडीत दीनदयाळ यांचे विचार माझ्याकडे आहे. पक्ष हे माझ्यासाठी सर्वात प्रथम आहे. सर्वात प्रथम सत्ता आहे आणि नंतर संघटन असे माझ्या रक्तात नाही. अप्रामाणिकपणा माझ्या स्वभावात नाही. मी फक्त मुद्द्यावर बोलतेय. अनेक लोक प्रशासन व उद्योग सोडून मोदींकडे पाहून राजकारणात आले. चारित्र्य संपन्न नेते त्यांनी घडवावे असे लोकांना वाटते, असेही मुंडे यांनी स्पष्ट केले.

मी कधीच राहुल गांधी यांना भेटले नाही

मी ईश्वर साक्ष वागते. मी कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही नेत्याशी पक्ष प्रवेशासाठी भेटलेले नाही. मी राहुल गांधी व सोनिया गांधींना कधीच प्रत्यक्ष भेटलेले नाही. मी नाराज नाही पण दु:खी आहे. बाळासाहेबांची शिवसेना व शरद पवारांची राष्ट्रवादी राहिली नाही असे लोक बोलतात. पण दीनदयाळ उपाध्याय यांची भाजप सदैव राहो यासाठी मी प्रयत्न करत राहणार, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

नाव न घेता टोला लगावला

लपून छपून काम करणे मला जमत नाही. मला जे काही करायचे असेल ते मी डंके ती चोट पर करेल. हा पक्ष संपला, ही सत्ता उलथवून टाकली यातच सगळे सुरु आहे. लोकांचे काय, असा टोलाही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here