Twitter : @ManeMilind70

मुंबई: वर्षभरापूर्वी शिवसेनेत बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या आमदारांपैकी 16 आमदार परतीच्या मार्गावर असल्याचा दावा केला जात असला तरी त्या बंडखोरांच्या मतदारसंघात मागील वर्षभरापासून निवडणुकीची तयारी केलेल्या कार्यकर्त्यांचे काय करायचे? असा प्रश्न सेना नेतृत्वाला पडला आहे. याबाबतची सेना नेतृत्वाची भूमिका अद्याप गुलदस्त्यात असल्याने परतीच्या मार्गावरील बंडखोर आमदारांची द्विधा मनस्थिती झाली आहे।

मागील वर्षभरापूर्वी शिवसेना पक्षाला सुरुंग लावून विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करून 40 सेना आमदारांसहित राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सत्ता स्थापन केली. मात्र या बंडखोरांपैकी 16 आमदारांना विरोधात सुप्रीम कोर्टात शिवसेनेने याचिका दाखल केली. त्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला असला तरी त्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना असल्याने या बाबतचा निर्णय पावसाळी अधिवेशनापूर्वी घ्यावा, यासाठी पुन्हा उद्धव ठाकरे गट सुप्रीम कोर्टात गेले आहेत.

राज्य विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून मुंबई मध्ये सुरू होत आहे. त्याआधी राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला असून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षात बंडखोरी करून राष्ट्रवादी पक्षातील आमदारांना सोबत घेऊन आमदारांसहित शिंदे – फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र शिंदे गटातील आमदार वर्षभरापासून मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला डावलून भाजपाने पवार गटाला सत्तेमध्ये सामील करून लागलीच त्यांना मंत्रिपदे बहाल केली. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर धुसफुस आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी शिंदे गटाच्या झालेल्या बैठकीत दोन आमदारांमध्ये मंत्रीपदावरून बाचाबाची होऊन त्याचे रूपांतर मारामारीत झाले. परिणामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नागपूर दौरा अर्धवट सोडून मुंबईत परतावे लागले. त्यातच पवार गटातील आदिती तटकरे यांना मंत्रिपदाची शपथ दिल्याने शिंदे गटात मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली व ठरल्याप्रमाणे आम्हाला मंत्रीपद कधी देणार यावर शिंदे गटात मोठ्या प्रमाणावर राजकीय घमासान झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे येत्या दहा तारखेला पुन्हा एकदा मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची आवई शिंदे गटाकडून व फडणवीस गटाकडून उठवली जात आहे.

बंडखोर 16 आमदार पुढील प्रमाणे

शिवसेनेत बंडखोरी करून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे अपात्र होणारे शिंदे गटातील आमदारांची नावे – एकनाथ शिंदे ,अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, यामिनी जाधव, संदिपान भुमरे, भरत गोगावले, संजय शिरसाट, लता सोनवणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किनीकर, बालाजी कल्याणकर, अनिल बाबर, संजय रायमुलकर, रमेश बोरनारे, चिमणराव आबा पाटील, महेश शिंदे हे आमदार विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर सहा वर्षांनी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरू शकतात.

एकनाथ शिंदे गटातील 16 आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरविल्यास शिंदे गटाबरोबर असणाऱ्या उर्वरित 24 आमदारांचे भवितव्य अंधारात आहे. त्यातील सोळा आमदारांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे परतीचा प्रवास करतो असे शिंदे गटाच्या बैठकीत सांगितल्याने शिंदे समर्थक स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची द्विधा मनस्थिती झाली आहे. मात्र या 16 आमदारांना पुन्हा शिवसेनेत प्रवेश दिल्यास या 16 आमदारांच्या मतदारसंघात वर्षभरापासून कार्यरत असणाऱ्या व निवडणुकीच्या तयारीला लागण्यास सांगितलेल्या पदाधिकाऱ्यांचे काय करायचे असा प्रश्न मातोश्री समोर पडला आहे. त्यामुळे या 16 आमदारांना पुन्हा शिवसेनेत प्रवेश मिळतो की नाही याबाबतची शिवसेनेची भूमिका अद्यापी असल्याने त्या 16 आमदारांची द्विधा मनस्थिती झाली असल्याचे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here