@maharashtracity

कोरोना टास्क फोर्स तज्ज्ञांचा सल्ला

मुंबई: शेजारील राज्यात ओमिक्रॉनचा (Omicron) शिरकाव झाला असून महाराष्ट्रात (Maharashtra) संशयित आढळत आहेत. ओमिक्रॉनच्या विरोधात लढण्यासाठी आपणच काळजी घेतली पाहिजे. सध्या गर्दी वाढत असून गर्दीत फिरताना डबल मास्कचा वापर करण्याचा सल्ला कोविड टास्क फोर्समधील (Covid Task Force) वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत.

कर्नाटकात (Karnataka) ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आल्याने राज्य सरकारने सावध पावित्रा घेतला आहे. यातून राज्यातील सद्यस्थिती पाहून कोविड टास्क फोर्सनेही राज्य सरकारला काही सुचना केल्या आहेत.

ओमिक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण (vaccination) पूर्ण करणे आणि बाहेर पडताना डबल मास्क (Double mask) वापरणे योग्य असल्याचे कोरोना टास्कफोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी (Dr Shashank Joshi) यांनी सांगितले. कोणताही विषाणू हा हवेतून पसरणारा असल्याने डबल मास्किंग करणे महत्त्वाचे आहे. कापडाच्या मास्कमुळे व्हायरसचा संसर्ग कमी होत नाही. त्यामुळे, नागरिकांनी किमान ३ प्लाय मास्क किंवा एन ९५ मास्क लावणे आवश्यक आहे. अशा सुचना तज्ज्ञ करत आहेत.

कोरोनाच्या मध्यावर डेल्टा (Delta) आणि डेल्टा प्लस स्ट्रेनचा प्रभाव अधिक होत होता. मात्र त्याहूनही अधिक घातकी वेरियंट ओमिक्रॉन आढळून आल्याने संशोधक त्या दिशेने अभ्यास करत आहेत. तुर्तास ओमिक्रॉन डेल्टा पेक्षाही झपाट्याने पसरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दक्षिण आफ्रिकेत आता सौम्य ते गंभीर असे रुग्ण वाढायला लागले आहेत. रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही वाढले आहे पण आयसीयूतील (ICU) रुग्ण वाढलेले नाहीत. यावरुन ऑक्सिजनचा (Oxygen) वापर वाढला आहे, बेड्स पुन्हा भरले आहेत. आयसीयू रुग्णांमध्ये वाढ नाही ही एक दिलासादायक बाब आहे. पुढच्या ३ ते ६ आठवड्यात याचं नेमके चित्र स्पष्ट होईल असेही डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.

तुर्तास देशात येणारा ओमिक्रॉन वेरियंट हा परदेशी प्रवाशांकडूनच येऊ शकतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळावरच जास्तीचे निर्बंध लादले पाहिजे असा सल्ला राज्य आणि केंद्र सरकारला देण्यात आला आहे.

दरम्यान लसीकरणावर भर देण्यास देखील सुचविले जात आहे. कोव्हिशील्ड (Covishield) आणि कोव्हॅक्सीन (Covaxin) या दोन्ही लसी ओमिक्रॉनवर प्रभावी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे, लवकरात लवकर लसीकरण होणे गरजेचे आहे. शिवाय, लसीकरणाचा दुसरा डोस घेणे महत्त्वाचे आहे. ज्यांनी अजिबातच डोस घेतलेला नाही त्यांनीही लवकरात लवकर लस घेतली पाहिजे असे आवाहन डॉ. जोशी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here