@vivekbhavsar

लॉकडाऊननंतर राज्यात 28 वाहक-चालकांच्या आत्महत्या

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे बस वाहकाने एस टी बसच्या मागच्या बाजूस गळफास घेऊन आत्महत्या केल्याने राज्यभर हळहळ व्यक्त होत आहे. ही केवळ एकच आत्महत्या नाही तर मागच्या वर्षी 21 मार्च नंतर राज्यात लागू झालेल्या लॉकडाऊननंतर अशा प्रकारे एस टी बसच्या 28 वाहक आणि चालकांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे. या आत्महत्येमागे एस टी कर्मचाऱ्यांच्या बँकेकडून होणारी ‘पठाणी’ कर्जवसुली कारणीभूत असल्याची प्रतिक्रिया काही बस वाहकांनी नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली.

कोरोना महामारीमुळे (corona pandemic) राज्यासह देशात लॉकडाऊन (Lockdown) लावण्यात आल्यानंतर केंद्रीय वित्त मंत्रालय आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्जवसुली (recovery of loan) थांबवण्याचे आदेश सर्व राष्ट्रीयकृत, खाजगी आणि सहकारी बँकांना दिले होते. यावर सर्वत्र अंमलबजावणी झाली. केवळ एस टी कर्मचारी सहकारी बँक (MSRTC cooperative Bank) याला अपवाद होती.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक हे या सहकारी बँकेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर हनुमंत ताटे यांच्या मान्यताप्राप्त एस टी कर्मचारी संघटनेचे वर्चस्व या बँकेवर आहे.

एस टी बस वाहक आणि चालकांच्या आत्महत्येबाबत maharashtracity ने काही कर्मचाऱ्यांना बोलते केले. नोकरीवर गदा येईल या भीतीने नाव न छापण्याच्या अटीवर ते बोलते झाले.

Also Read: सरकार पाडण्याचा नवा मुहूर्त?

“देशातील अन्य खाजगी आणि सहकारी बँका गरजू कर्जदाराला साधारण 9 ते 10 टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देतात. मात्र, आमचीच एस टी ची सहकारी बँक आमच्याकडून वार्षिक 12 टक्के व्याजदर आकारते,” अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील एक वाहक म्हणाला.

जळगावच्या (Jalgaon) एका चालकाने या माहितीला दुजोरा देतांना सांगितले की, कोरोना काळात सर्व बँकांनी कर्जवसुली थांबवली होती. मात्र, एस टी ची सहकारी बँक कर्ज वसुली करत होती.

‘ही वसुली पठाणी पद्धतीची होती. म्हणजे आमचा हप्ता थकला तर व्याजावर व्याज (चक्रवाढ व्याज) लावले जात होते”, असे सांगून हा चालक पुढे म्हणाला, आमचे पगार कापले जात होते, मुळातच अत्यंत कमी पगार हातात येत असतांना बँक कर्जाचे हप्ते कापून घेत होते. जगण्यासाठी किमान रक्कम लागते, तीही हाती लागत नसल्याने अनेकांनी निराश होऊन आत्महत्या केल्या,” अशी माहिती या चालकाने दिली.

इंटक (INTUC) नेते जयप्रकाश छाजेड (Jayprakash Chhajed) यांच्याशी संपर्क साधला असता, बँकांच्या वसुलीला कंटाळून या आत्महत्या झाल्याच्या दाव्याला त्यांनी पुष्टी दिली. मात्र, ही पठाणी वसुली होती या शब्दाशी त्यांनी असहमती दर्शवली.

छाजेड म्हणाले, मुळातच एस टी चे वाहक आणि चालकाचे पगार अत्यंत कमी. कोरोना काळात चार हजार किंवा त्यापेक्षा कमी पगार हातात येत होता. अशा वेळी अन्य बँकाप्रमाणे एस टी सहकारी बँकेने कर्जवसुली थांबवायला हवी होती. ती सुरुच ठेवली. ज्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या घरात अन्नाचा कण नव्हता, दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला होता. म्हणून या आत्महत्या झाल्या, अशी प्रतिक्रिया जयप्रकाश छाजेड यांनी व्यक्त केली.

दरम्यान, मान्यताप्राप्त एस टी कर्मचारी संघटनेनेचे नेते हनुमंत ताटे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही.

दरम्यान, मंत्र्यांनी दलालीतून वेळ काढावा आणि कर्मचाऱ्यांकडे लक्ष द्यावे, अन्यथा दिवाळीत या कर्मचाऱ्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारचे दिवाळे निघेल अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या चित्रा वाघ (BJP leader Chitra Wagh) यांनी दिली आहे.

आत्महत्या केलेले वाहक आणि चालक

1. मोहन पाटील, जामनेर

2.पांडुरंग गडदे, रत्नागिरी

3. मनोज चौधरी, जळगाव

4. शरद जाधव, निलंगा

5. धनंजय नामे, देवरुख

6. विशाल हटवार, नागपूर

7. वसंत जाधव, वसमत

8. अशोक नाईकवाडे, नाशिक

9. संजय जानकर, माहूर

10. गोविंद मगनाडे, कंधार

11. भास्कर वंजारी, पांढरकवडा

12. संजय हेमगिरी, उदगीर

13. संजय शिवटे, माढा

14. केंद्रे ताई, अहमदपूर

15. अमोल माळी, इस्लामपूर

16. प्रकाश पावरा, शहादा

17. कमलाकर बेडसे, साक्री

18. दशरथ गीते, पंढरपूर

19. सुभाष नेतारे, पाथर्डी

20. प्रकाश भुरके, सोलापूर

21. हर्षद राव, वरोरा

22. शत्रुघ्न कंगारे, साकोली

23. दीपक पारगे, रत्नगिरी

24. कृष्णा पुरी, कोल्हापूर

25. तुकाराम सानप, भीड

26. दिलीप काकडे, शेवगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here