@maharashtracity

धुळे: कोरोना विषाणूचे संकट अद्याप संपुष्टात आलेले नाही. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून होणार्‍या विविध उपाय योजनांना गती देत जिल्हा वार्षिक योजनेचा निधी विहीत कालावधीत विकास कामांवर खर्च होण्यासाठी आतापासून नियोजन करावे. लोकप्रतिनिधींनी सूचविलेल्या कामांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी येथे दिले. (Abdul Sattar suggested to do plan of expenses while speeding projects)

जिल्हा नियोजन समितीची (DPC) बैठक सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पार पडली. त्यावेळी पालकमंत्री सत्तार बोलत होते.

पालकमंत्री सत्तार म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होणार्‍या निधीतून 30 टक्के निधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांचे बळकटीकरणासाठी राहणार आहे. त्यानुसार आरोग्य यंत्रणांनी नियोजन करावे.

धुळे जिल्ह्यासाठी 200 डीपी (ट्रान्स्फॉर्मर) खरेदी करण्यात आले आहेत. वीज वितरण कंपनीने शेतकर्‍यांकडून मागणी झाल्याबरोबर ते 72 तासांच्या आत बदलावेत. शाळांना तातडीने वीज जोडणी उपलब्ध करून द्यावी. गाव-पाडे वीज जोडणीसाठी वीज कंपनीने सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करीत लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांना प्राधान्य द्यावे.

जिल्हा वार्षिक योजनेचा सन 2020- 2021 या आर्थिक वर्षातील समर्पित निधी परत मिळविण्यासाठी प्रयत्न केले जातील. विमा कंपनीच्या परतावा योजनेत धुळे जिल्ह्यातील कापूस पिकाचा समावेश करण्याची शिफारस करण्यात येईल.

तसेच या बैठकीस अनुपस्थित राहणार्‍या अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावून जिल्हाधिकार्‍यांनी दरमहा जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा घ्यावा, अशा सूचनाही पालकमंत्री सत्तार यांनी केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here