मुंबई
देशातील सर्वात मोठी टेक कंपनी टाटाचे मालक रतन टाटा यांच्याबाबत मुंबई पोलिसांना एक धमकीचा फोन आला होता. यात कॉल करणाऱ्याने रतन टाटा यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. रतन टाटांची सुरक्षा वाढवा, अन्यथा त्यांची अवस्था सायरस मिस्त्रीसारखी होईल, अशी धमकी अज्ञात व्यक्तीकडून देण्यात आली होती. या कॉलनंतर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या फोननंतर मुंबई पोलिसांनी पुन्हा त्या नंबरवर कॉल केला, मात्र फोन बंद होता. यानंतर पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने टेलिकॉम कंपनीच्या मदतीने कॉलरचा पत्ता मिळवला. हा नंबर पुण्यातील एका व्यक्तीचा होता, मात्र लोकेशन तपासलं असता ही व्यक्ती कर्नाटकात राहत असल्याचं समोर आलं. पोलिसांनी त्याच्या घरी तपास केला. आणि तो पाच दिवसांपूर्वी घरातून बाहेर पडल्याचं त्याच्या पत्नीने सांगितलं.
आरोपी मानसिक आजाराने पीडित
चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, कॉलर मानसिक आजार स्क्रिझोफिनीयाने पीडित आहे. घरात कोणालाही न सांगता तो फोन घेऊन निघून गेला. त्याच फोनवरुन त्याने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात कॉल करून रतन टाटा यांना जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपी मानसिक रूग्ण असल्याने त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाऊ शकत नसल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितलं.