By विजय साखळकर

@maharashtracity

अब्दुल करीम शेरखान हा मुंबईचा पहिला डाॅन असं वर्णन केलं जातं. पण अयुब लालानं त्याला ‘जिरगा ए पख्तुन’ या संस्थेचा अध्यक्ष म्हणून घोषित करुन मुंबईबाहेर प्रस्थान ठोकले. बरेच जण करीम लाला अफगाणिस्तानच्या सरदार घराण्यातील किंवा राजघराण्यातील असल्याचे व १९११ साली तो मुंबईत आला असा निष्कर्ष मांडतात. पण दोन्ही निष्कर्ष चुकीचे असावेत. कारण……

करीमलाला १९११ साली मुंबईत आला असे मानले तर २०११ साली त्याच्या मुंबईत दाखल होण्याला शंभर वर्षै पूर्ण होतात. तो वर्षभराचा असताना मुंबईत दाखल झाला म्हणता येणार नाही. करीम लाला आणि रहीम लाला हे दोन्ही भाऊ मुंबईत दाखल झाले त्यावेळी साधारण
वीस वर्षाचे तरी असावेत….. म्हणजे २०२१ मध्ये त्यांच्या मुंबईतील वास्तव्याला १२० वर्षे पूर्ण होतात. इतकी वर्षे जगणे कसे शक्य असेल ?

आणखी एक चुकीचा दावा केला जातो तो हा की दोघे भाऊ राजघराण्यातील होते. अफगाणिस्तान १९११ साली एखाद्या राजघराण्याच्या ताब्यात असेल असे वाटत नाही. अफगाणिस्तानभर टोळ्यांचा वावर होता. अगदी अलीकडे अलीकडे या सगळ्या टोळ्यांचा नि:पात करून किंवा त्यांना एकत्र आणून अमेरिकेनं तेथे लोकाभिमुखता आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला. ते सरदार घराण्यातील असते तर पोटासाठी भारतात येण्याचं प्रयोजन काय?

करीमलाला रहिमलालासह मुंबईत दाखल झाला त्यावेळी छोटा मोठा कारभार करून पैसा कमावणं हा त्याचा उद्देश होता. त्या काळात मुंबईतील पठाणांना अयुब लालानं स्थापन केलेल्या ‘जिरगा ए पख्तुन’ या संस्थेमार्फत हमीपत्र भरवून द्यावं लागे. कारण त्याकाळी मुंबईतील बहुतांश पठाण व्याजानं पैसे कर्जाऊ देत आणि भरमसाट व्याज आकारीत. वसुलीसाठी ते अमानुष उपाय अवलंबीत असत.

म्हणूनच पठाणी व्याज आणि पठाणी वसुली हे वाक्प्रचार रूढ होत गेले.

करीम लाला मुंबईत आल्यावर काही काळ डाॅकमध्ये काम करीत होता असंही काही ठिकाणी वाचायला मिळते. पण त्यालाही आधार नाही. जाणकार सांगतात की अयुब लालानं पठाणांचा नेता म्हणून त्याचं नाव जाहीर केलं त्यावेळी तो त्याची टिंक्चरची एजन्सी चालवीत होता आणि अयुब लाला याला ‘पख्तुन ए जिरगा’ या संस्थेच्या कामात मदत करीत होता.

टिंक्चर आयोडीनच्या एजन्सीमध्ये त्याला आणि त्याच्या भावाला एका बाटलीमागे चार आणे मिळत. आणे हे त्यावेळचं पैसे मोजण्याचं परिमाण. सहा पैसे म्हणजे एक आणा. सोळा आणे म्हणजे एक रुपया. चार आण्याला पावली असंही म्हटलं जात असे, दोन आण्यांना चवली आणि आठ आण्यांंना अधेली म्हटलं जात असे. मेहनतीच्या मानानं मिळणारा पैसा फारच कमी होता. म्हणून करीम आणि रहीम काही तरी वेगळा व्यवसाय शोधण्याच्या मागे होते.

एकदम चौदा हजार पठाणांचा नेता झाल्यानंतर करीम लालानं आणखी दोन नवे व्यवसाय सुरू केले. एक म्हणजे कावाखाना आणि दुसरा व्यवसाय म्हणजे हुक्का पार्लर. त्यावेळी पार्लर हा नाजूक शब्द अस्तित्त्वात नव्हता. अड्डा असं म्हटलं जात असे. याखेरीज अयुब लालाच्या अखत्यारीतील सर्व सोशल क्लबही त्याच्या अधिपत्त्याखाली आले. त्यामुळे पैशाचे प्रवाह त्याच्याकडे वाहू लागले.

इथं सोशल क्लब, कावाखाना आणि हुकका पार्लर याविषयी थोडी माहिती देणं क्रमप्राप्त आहे.

सोशल क्लब ही कायदेशीर मान्यता असणारी पद्धती होती. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे नागरिक विरंगुळा म्हणून या जागी पत्ते खेळून मन रिझवण्यासाठी अमुक अमुक नावाने एक सोशल क्लब सुरू करीत आहोत या आशयाचा अर्ज देऊन पोलीस यंत्रणेची परवानगी मिळवून हा व्यवसाय सुरू केला जाई. प्रत्यक्षात जागा, फर्निचर वगैरेची गुंतवणूक दुस-याच कुणाची असे.

कावा हे काश्मीर परिसरातील एक लोकप्रिय पेय. त्यात दालचिनी, ज्येष्ठमध, बेदाणे, सुका मेवा असे सारे काही टाकले जात असे. फार थंडी असेल अशा वेळी हे पेय प्यायल्यानं तरतरी येत असे. पण मुंबईतील हे कावा पेय हे जबर शक्तिशाली असं पेय होतं. कावाखाने सुरू केले गेले तेव्हा त्यात सर्व पौष्टिक पदार्थांबरोबरच खसखस, घासलेट आणि अन्य नशीले पदार्थ टाकले जात. आज टपरीवर चहा मिळतो तसा हा कावा कपातून दिला जात असे व चार आण्याचा हा कावा पिण्यासाठी श्रमिकांची प्रचंड गर्दी होत असायची.

हुक्का पार्लर तर सा-यांनाच माहीत आहे. गुडगुडी, हुक्का अशा नावाने प्रसिद्ध असणारं हे नशेचं यंत्र म्हणजे शाही व्यसन. दहा बाय दहाच्या खोलीत मध्यभागी हुक्का ठेवलेला असायचा. सभोवताली माणसं असायची. प्रत्येकाची पाळी आली की नळी तोंडात धरून तो जोरदार दम मारत असे. काही क्षण वाट पाहून दुसरा नळी हाती घेत असे. कारण आधीचा दम मारून तेथेच लुडकलेला असे.

या सर्व पैसे मिळवून देण्याच्या धंद्यात असतानाही करीम लाला त्याच्या गोतावळ्यातील माणसांना नेहमी सांगत असे…. जमीन पकडो… जमीन सोना है…. आज नही लेकिन दस साल मे दसगुना पैसा देगी…..

करीम लाला हि-याची तस्करी करायचा असाही उल्लेख काही गुन्हे पत्रकारांच्या लेखनातून येतो. पण ते खरं वाटत नाही. अफगाणिस्तान हा अंमली पदार्थांच्या व्यापारासाठी आणि निर्मितीसाठी स्वर्ग मानला जात असे.. तेथून तो आला त्यामुळे अमली पदार्थांच्या व्यापाराशी त्याचा काही संबंध असू शकतो.

(पुढच्या भागात करीम लालाचे किस्से)

(लेखक विजय साखळकर हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांनी अनेक वर्षे गुन्हेगारी जगताचे वार्तांकन केले आहे.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here