ललित माळी, विधानसभा संघटक, उद्धव सेनेचे विभाग संघटक ललित माळी यांची मागणी

By Sanjay Sonawane

Twitter: @maharashtracity

धुळे: पूर्वीच्या काळी भर उन्हाळ्यातही धुळेकर नागरिकांना एक दिवसाआड पाणी मिळत होते. मात्र, भाजप सत्तेवर आल्यानंतर धुळेकर नागरिकांना पंधरा पंधरा दिवस पिण्याचे पाणी मिळत नाहीये. त्यांनी खोटे आश्वासन देणे बंद करावे आणि नियमित पाणी पुरवठा करता येईल असे नियोजन करावे अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेस विभागीय संघटक ललित माळी यांनी केली आहे.

एका सविस्तर निवेदनाद्वारे ललित माळी यांनी नमूद केले आहे की, तब्बल बारा ते पंधरा दिवसानंतर देखील धुळेकर जनतेस पाणी पुरवठा केला जात नसल्याने, नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. भाजप सत्ताधाऱ्यांचे प्रशासनावर कोणतीही नियंत्रण नाही. अकुशल व अकार्यक्षम भाजपच्या नगरसेवकांमुळे धुळेकरांचे पाण्यासाठी अतोनात हाल होत आहेत. मागील सुमारे एक वर्षापासून भाजपचे पदाधिकारी व खासदार एक दिवसाआड पाणी देऊ असे वृत्तपत्रांच्या व प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून नागरिकांना आश्वासित करीत आहेत. परंतु ढिसाळ प्रशासना वर भाजप सत्ताधाऱ्यांचे नियंत्रण नसल्याकारणाने याची मोठी किंमत नागरिकांना मोजावी लागत आहे. 

धुळ्यात सद्यस्थितीत सुमारे दहा ते पंधरा दिवसांनी पाणी मिळत आहे. जनतेस पाहण्यासाठी वण वण फिरावे लागत आहे. भाजप खासदार व भाजपचे पदाधिकारी मात्र धुळेकर जनतेस एक दिवसाआड पाणी देण्याचे गाजर दाखवीत आहेत. भाजप हा खोटारड्यांचा पक्ष आहे हे यावरून सिद्ध होत आहे. खोटे बोलून जनतेची दिशाभूल करणे, हा भाजपाचा राष्ट्रीय कार्यक्रम धुळ्यातील भाजपचे पदाधिकारी हे रेटून खोटे बोलण्याचा त्यांचा पक्षाचा अजेंडा यशस्वीरित्या धुळ्यात राबवीत आहे, असा आरोप ललित माळी यांनी केला.

भाजपच्या अधी सत्तेवर असलेले पदाधिकाऱ्यांच्या कालावधीत धुळेकर जनतेस भर उन्हाळ्यात दोन दिवसाआड पाणी मिळत होते. परंतु भाजपा सत्ताधाऱ्यांचे प्रशासनावर कोणतेही नियंत्रण नसल्याने नकाने तलाव, डेडरगाव तलाव, तापीत पाण्याचा मुबलक साठा असताना देखील केवळ ढिसाळ नियोजनामुळेच धुळेकर जनतेस दहा ते पंधरा दिवसानंतर ही पाणी दिले जात नाही, असे ललित माळी यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, धुळ्यातील मनपाही महाराष्ट्रातील सर्वाधिक पाणीपट्टी वसूल करणाऱ्या महानगरपालिकेमधील एक आहे. प्रचंड पाणीपट्टी वसूल करून देखील भाजप सत्ताधारी धुळेकरांना वेळेत पाणी देऊ शकत नाही, ही दुर्दैवी बाब आहे.

आभास निर्माण केला जात आहे

वास्तविक चार वर्षांपूर्वी मनपाकडून भर उन्हाळ्यात दोन दिवसात पाणी पुरविले जात होते. धुळे शहराला पुरवठा करणाऱ्या जलस्त्रोतांमध्ये आजही मुबलक पाणी आहे. असे असताना देखील नवीन योजनेअंतर्गत पाणी देऊ असे खोटे आश्वासने देऊन पूर्वी सुरळीत रित्या चालत असलेल्या पाणीपुरवठा यंत्रणा नियोजना अभावी डबघाईस घालण्यात आली आहे. यास सर्वस्वी अकार्यक्षम व ढिसाळ नियोजन असलेले प्रशासन तसेच सत्ताधारांचे प्रशासनावर कोणताही अंकुश नसल्याने, चारही बाजूने पाणी असलेल्या धुळ्याचे पाण्याअभावी वाळवंटा सारखे स्वरूप झालेले आहे. 

पाणीपुरवठा योजनेअंतर्गत महानगरपालिकेत भ्रष्टाचार झाला आहे. त्या भ्रष्टाचारात प्रशासनातील काही अधिकारी तसेच सत्ताधारी भाजप पक्षातील काही पदाधिकारी व नगरसेवक यांचे हात बरबटले आहेत. याच कारणास्तव सत्ताधारी भाजप हे प्रशासनावर कोणतेही नियंत्रण ठेवू शकत नाही. भ्रष्ट संबंधित अधिकारी व भाजप पदाधिकारी यांचे भोग मात्र धुळेकर जनतेस भोगावे लागत आहेत. 

अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेत भाजप पदाधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार?

अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना यातील सुमारे 44 किलोमीटरचे काम हे केवळ सात ते आठ महिन्यात झाले आहे. केवळ 400 मीटर अंतरासाठी तब्बल दीड वर्षाचा कालावधी लागला आहे. या 400 मीटर अंतरातील शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळाली नाही, या कारणास्तव जवळपास दोन वर्षाच्या कालावधीपर्यंत कामकाज करू दिले नसल्याची सबब सांगण्यात येत आहे. मुळात काम बंद पडणारे खरंच शेतकरी होते का? कारण धुळ्यातील काही शेठजींनी तेथे नुकसान भरपाई मिळण्याच्या उद्देशाने जमिनी घेतल्याचे सांगितले जात आहेत. हे तथाकथित शेतकरी हे व्यापारी असल्याचे सांगितले जात आहे. तसेच काम बंद पाडणारे तथाकथित शेतकरी व्यापारी हे काही भाजप पदाधिकाऱ्यांचे नातेसंबंधातील व मित्र परिवारातील असल्याचे सांगितले जात आहे. भाजप पदाधिकाऱ्यांनी सत्तेचा गैरवापर करत आर्थिक फायदा करून घेण्याच्या हेतूने धुळेकर जनतेसाठी अति महत्वपूर्ण असलेल्या अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचे कामकाज तब्बल दीड वर्ष होऊ दिले नव्हते. याच कारणास्तव धुळेकर जनतेस अद्याप कोट्यावधी रुपये खर्च केल्यानंतर देखील वेळेत पाणी मिळू शकले नाही. केवळ आठ महिन्याच्या अंतरात पूर्ण होणारी योजनेस तब्बल चार वर्षापेक्षा अधिक कालावधी लागला आहे. या सबंध गैरव्यवहाराची चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच झारीतील शुक्राचार्य कोण हे देखील धुळेकर जनतेसमोर येणे गरजेचे आहे. 

धुळे महानगरपालिकेतील मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणजेच आयुक्त यांना या खुल्या निवेदनाद्वारे विनंती की, येणाऱ्या आठ ते दहा दिवसाच्या आत धुळेकर जनतेस दोन दिवसात पाणी पुरवठा न केल्यास शिवसेना मोठ्या स्वरूपात आंदोलन करेल याची नोंद घ्यावी, असे ललित माळी यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here