31 मे च्या आधी पुरस्कार प्रदान करणार – गिरीश महाजन
Twitter: @maharashtracity
मुंबई: मागील तीन वर्षांपासून प्रलंबित असलेले शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार या महिन्यातच प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी केली. मंत्री गिरीश महाजन यांच्या शासकीय निवासस्थानी आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार राज्यस्तरीय पुरस्कार निवड समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.
यावेळी क्रीडा व युवक कल्याण प्रधान सचिव रणजित सिंह देओल, आयुक्त डॉ. सुहास दिवसे, उप सचिव सूनिल हंजे, अशासकीय सदस्य महाराष्ट्र ऑलम्पीक असोसीएशनचे सचिटणीस नामदेव शिरगावकर, अर्चना जोशी, पॅराऑलिम्पीक असोसिएशन प्रतिनिधी, अंतरराष्ट्रीय धावपटु कविता राऊत उपस्थित होते.
मंत्री महाजन म्हणाले, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आणि खेलो इंडिया युथ गेम स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंना शासनाकडून देण्यात येणाऱ्या बक्षिसांच्या रोख रक्कमेत दुप्पट ते चौपट वाढ करण्यात आली आहे. सन 2022-23 मध्ये पार पडलेल्या 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, 4 थी व ५ व्या खेलो इंडिया युथ गेम्स या स्पर्धांतील पदक विजेत्या खेळाडूंच्या बक्षीसांची रक्कम तातडीने त्यांच्या बँक खात्यात आरटीजीएसद्वारे जमा करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
तर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा व जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेतील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराच्या कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे.
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी एकुण 891 प्रस्ताव प्राप्त झाले होते. या प्रस्तावांची तीन टप्प्यांमध्ये छाननी करुन ते विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत. त्यावर हरकती मागवण्यात येऊन त्यांचे निराकरण देखील करण्यात आलेले आहे. त्यानंतर राज्य पुरस्कार निवड समितीची बैठक दि. 11 मे 2023 रोजी क्रीडा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीनंतर अंतरीम पात्र पुरस्कारार्थींची यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्यावर हरकती सादर करण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात येईल.
राज्यात क्रीडा संस्कृतीचा वारसा जपला जाऊन त्याचे संवर्धन व्हावे, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्ती, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू आणि साहसी कामगिरी करणाऱ्या व्यक्ती यांचा गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार याच महिन्यात प्रदान करण्यात येणार असल्याचे गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र राज्यातील गुणवंत, सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्याची योजना सन १९६९-७० पासून आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नांव उज्ज्वल करणारे खेळाडू घडविणाऱ्या क्रीडा मार्गदर्शकांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देण्याची योजना सन १९८८-८९ पासून शासनाने अंमलात आणली आहे.
तसेच ज्येष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, संघटक/कार्यकर्ते व क्रीडा क्षेत्राशी संबंधित ज्या व्यक्तींनी क्रीडा व खेळासाठी आपले सर्वस्व पणाला लावून आपले जीवन क्रीडा विकासासाठी व्यतीत केले आहे, अशा ज्येष्ठ क्रीडा महर्षिचा गौरव करण्यासाठी सन २००१-२००२ पासून महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार देण्याची योजना अंमलात आणली आहे.
आपल्या खेळाबद्दलच्या भावना आणि संस्कृती जपण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासन प्रयत्नपूर्वक विविध गौरवशाली पुरस्कार देत आहे. मात्र गेले तीन वर्षे हे पुरस्कार प्रदान करण्यात आले नाही.
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारामध्ये शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडु), शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडु) आणि उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारांचा समावेश आहे. या पुरस्काराचे स्वरुप सन्मानपत्र, स्मृती चिन्ह व एक लक्ष रुपये असे आहे. तर यामधील शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्काराचे स्वरुप सन्मानपत्र, स्मृती चिन्ह व तीन लक्ष रुपये असे आहे.