By Sadanand Khopkar

Twitter : @maharashtracity

मुंबई: मुंबई आणि महानगरात इमारतींचे जाळे विस्तारत असतानाच, फसवणुकीचे प्रमाणही वाढले आहे. घर घेतल्यानंतर बरीच वर्षे जागा नावावर न होण्याच्या तक्रारी यात सर्वाधिक आहेत. अशा तक्रारी तात्काळ सोडवण्यासाठी ‘डीम्ड कन्व्हेयन्स’ अर्थात मानीव हस्तांतरण प्रक्रिया कशी करावी, याबाबत सर्वसामान्य मुंबईकरांना माहिती देण्यासाठी मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पुढाकार घेतला आहे.

गोरेगाव येथे रविवारी होणाऱ्या गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या परिषदेत याबाबत विशेष माहिती स्टॉल उभारले जाणार आहेत.

मोफा अ‍ॅक्ट (महाराष्ट्र ओनरशीप फ्लॅट्स अॅक्ट १९६३) मधील कलम ४ मध्ये स्पष्ट उल्लेख आहे, की एखाद्या गृहबांधणी योजनेचे (हाऊसिंग स्कीम) ६० टक्के गाळे/ सदनिका विकले गेले, की त्या खरेदीदारांची गृहरचना संस्था स्थापन करणे हे बिल्डर, प्रमोटर यांचे काम आहे. संपूर्ण इमारत बांधून पूर्ण झाल्यावर चार महिन्यांच्या आत ही इमारत व त्याखालची आणि त्यासभोवतीची जागा या गृहरचना संस्थेच्या नावाने करून देणे प्रमोटर, बिल्डर यांना बंधनकारक आहे. परंतु बरेच प्रमोटर, बिल्डर हे करीत नाहीत. म्हणजेच खरेदीदार सदस्य राहावयास गेले तरी या इमारतीची मालकी त्यांची नसते. अशावेळी भूकंप होणे, इमारतीवर विमान कोसळणे इत्यादींसारख्या अनपेक्षित दुर्घटनेतून सदर इमारत कोसळली तर सर्व सदस्यांचा अधिकार आपोआप संपुष्टात येतो आणि ती जागा बिल्डरच्या घशात जाते.

त्यामुळे राज्यातील गृहखरेदीदारांचे यापासून संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मानीव हस्तांतरणाचा (डीम्ड कन्व्हेयन्स) कायदा केला आहे. या कायद्यान्वये, बिल्डर संमती देत नसेल, आडकाठी करीत असेल, बिल्डर काम अपूर्ण ठेवून परागंदा झाला असेल, तरीही इमारतीची मालकी सोसायटीच्या नावाने करून देण्याचे अधिकार जिल्हा उपनिबंधकांना देण्यात आले आहेत. यालाच मानीव हस्तांतरण असे म्हणतात. बिल्डरने जर सोसायटीच स्थापन केलेली नसेल तर त्या कामीही सहकार उपनिबंधक कार्यालयाकडून आवश्यक ती मदत/ सहकार्य मिळते. परंतु, बहुतांश गृहखरेदीदारांना याबाबत माहिती नसल्यामुळे ते आपल्या हक्कांपासून वंचित राहतात.

त्यामुळे मुंबईतील गृहखरेदीदारांना ‘डीम्ड कन्व्हेयन्स’बाबत इत्यंभूत माहिती देण्यासाठी मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पुढाकार घेतला आहे. रविवारी गोरेगाव येथे होणाऱ्या गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या परिषदेत याबाबत विशेष माहिती स्टॉल उभारण्याची सूचना त्यांनी केली आहे. गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here