Twitter: @vivekbhavsar 

मुंबई: कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी तब्बल २० जाहीर सभा घेऊनही आणि अमित शाह, जे पी नड्डा यांच्यासह डझनभर केंद्रीय मंत्री यांना प्रचारात उतरवूनही दक्षिणेचे प्रवेशद्वार असलेल्या या राज्याने भारतीय जनता पक्षासह नरेंद्र मोदी यांना नाकारले आहे. २२४ सदस्यीय कर्नाटक विधानसभेत दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास  भाजप ६३ जागांवर आघाडीवर होतील तर काँग्रेस १३७ ठिकाणी आघाडीवर होती. जनता दल (सेक्युलर) ने २० मतदारसंघात तर चार ठिकाणी अन्य पक्षांना आघाडी होती. भाजप आणि काँग्रेसमधील संख्याबळाची तफावत बघता

सरकार स्थापन करण्यासाठी लागणारी साधारण बहुमताची ११३ ही आकडेवारी काँग्रेस सहज गाठेल असा स्पष्ट अंदाज आता वर्तवला जात आहे. 

काँग्रेसने निवडणूक प्रचारात बजरंग दलाची तुलना बंदी घालण्यात आलेली मुस्लिम संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी केली होती आणि बजरंग दलावर देखील बंदीची मागणी केली होती. भाजपने काँग्रेसविरोधात हा मुद्दा प्रचाराच्या अग्रस्थानी आणून काँग्रेस पक्ष एकप्रकारे बजरंग अर्थात हनुमानाच्या विरोधात असल्याचा कांगावा केला होता. भाजपच्या आक्रमक हिंदुत्व मुद्द्याच्या प्रचारामुळे बजरंग दलाचा मुद्दा काँग्रेसच्या विरोधात जाईल, अशी भीती काँग्रेस नेत्यात व्यक्त केली जात होती. मात्र, बजरंग बलीही भाजपाला वाचवू शकले नाही, हे या निकालाने स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री, आमदार, प्रवक्ते कर्नाटकात खास करून महाराष्ट्राच्या सीमा भागातील मतदारसंघात प्रचाराला गेले होते. राज्यातील नेते महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या विरोधात प्रचार करत आहेत, एकप्रकारे ते मराठी उमेदवारांच्या विरोधात असल्याची टीका उद्धव ठाकरे गटाकडून केली गेली होती.

बेळगाव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. मात्र, या सीमावर्ती भागात मतदारांनी महाराष्ट्र एकीकरण समितीसह भाजपला नाकारले असून त्यांचे मत काँग्रेसच्या पारड्यात टाकले आहे.

या निकालानंतर काँग्रेसमध्ये चैतन्याचे वातावरण असून मध्य प्रदेशातही भाजपला पायउतार व्हावे लागेल आणि तिथेही काँग्रेस सत्तेत येईल, असा विश्वास काँग्रेसकडून व्यक्त केला जात आहे. 

हा जनतेचा विजय असून भाजपचा पराभव आहे, अशी प्रतिक्रिया जयराम रमेश यांनी व्यक्त केली आहे तर पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होईल, अशी प्रतिक्रिया सिद्धरामय्या यांनी व्यक्त केली आहे.  हा पराभव स्वीकारत असल्याची प्रतिक्रिया भाजपने व्यक्त केली आहे.

निकालाचा ट्रेण्ड

एकूण जागा – २२४
काँग्रेस – १३७
भाजप – ६३
जनता दल (सेक्युलर) – २०
अन्य – ४

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here