By Sachin Unhalekar

Twitter: @Rav2Sachin

मुंबई: आंबेडकरी चळवळीतील लढवय्या पॅथर, आक्रमक, प्रभावी वक्ता आणि युथ रिपब्लिकनचा तरूण नेता, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष भाई मनोज संसारे यांचे आज सायंकाळी निघन झाले. मागील दीड वर्षांपासून ते कोमामध्ये होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी आणि पत्नी असा परिवार आहे.

वडाळा कोरबा मिठागर या ठिकाणी शनिवार दिनांक १३ रोजी दुपारी १२ वाजेपर्यत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

त्यांनी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली होती. ते स्वतः दोन वेळा अपक्ष उमेदवार म्हणून मुंबई महापालिकेत नगरसेवक पदी निवडून आले होते. तसेच त्यांनी अपक्ष नगरसेवकांचे पालिकेत गटनेते पद ही भूषविले होते.

भाई मनोज संसारे यांचा लहान भाऊ राजेश यांचे आकस्मात निधन झाले आणि या घटनेचा मोठा धक्का त्यांना बसला. त्या धक्क्यातून ते स्वतःला सावरू शकले नाही. ते कोमात गेले होते. यासोबतच त्यांच्यावर पक्षघाताचे ही उपचार सुरु होते. गेले दीड वर्ष त्यांच्यावर उपचार सुरु होते, अशी माहिती त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अनुसरून मुंबई आणि महाराष्ट्रातील गावपातळीवर आंबेडकर समूहामध्ये ‘स्वाभिमान’ निर्माण करणारे झुंजार पँथर, ‘प्रत्येकाने बना स्वाभिमानी’ हा नारा बुलंद करणारे नेते तसेच शहीद पँथर भाई संगारे यांचा लढवय्या वारसा पुढे नेणारे, अशी त्यांची ओळख होती.

बाबासाहेब लेके हल्लाबोल, ये जय भिम लेके हल्लाबोल, हा नारा समाजात देताना येथे आपला कोणी नेता नाही, आपला फक्त एकच नेता आणि आपले साहेब एकच ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर’ , हे छाती ठोकपणे सांगताना दलित चळवळीतील सर्व पक्षाचे नेतृत्व नाकारत स्वतः च्या स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची वाटचाल सुरु ठेवली होती. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची कधीही न भरुन निघणारी हानी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here