Twitter: @maharashtracity

मुंबई: मुंबई महानगरपालिकेची रुग्णालये अत्याधुनिक उपकरणे, औषधे तसेच तज्ज्ञांनी कशी पुढारलेली आहेत याचा प्रत्यय देणारी आणखी एक घटना कांदिवली पश्चिमकडील महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात घडली. गेल्या महिन्यात एका महिलेने एका मुलीला जन्म दिला. जन्मानंतर काही तासातच या नवजात बाळाचे शरीर निळे पडू लागले व बाळाचा श्वासोच्छवास अनियमित झाला. या बाळाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे लक्षात आल्याने रुग्णालयातील डॉक्टरांनी बाळाला तातडीने अतिदक्षता कक्षात दाखल केले. येथील उपचारांना नवजात बाळाने चांगला प्रतिसाद दिल्याने महिन्याभरातच बाळ हसू खेळू लागले असल्याचे रुग्णालयातील डॉ. अजय गुप्ता यांनी सांगितले.      

दरम्यान, या बाळाचे वजन जन्मतः ३ किलो एवढे नोंदविले होते. मात्र बाळाच्या जन्माच्या दुसऱ्याच दिवशी बालरोगतज्ज्ञांच्या वॉर्डमधील भेटी दरम्यान बाळाचे शरीर निळे पडले असल्याचे तसेच बाळाचा श्वासोच्छवास अनियमित झाल्याचे दिसून आले. डॉक्टरांनी बाळाला तात्काळ अतिदक्षता विभागात दाखल करून बबल सीपॅप उपचार सुरू केले. तरीही बाळाचा श्वासोच्छवास नियंत्रित होत नसल्याने इनट्युवेटेड व व्हेन्टिलेटेड उपचार दिले. 

बाळाचा कृत्रिम श्वासोच्छवास सुरू झाल्यानंतर निओनॅटोलॉजिस्ट डॉ. मुकुंद शिरोळकर यांनी बाळाची बेडसाईड इको चाचणी केली. या चाचणीनुसार बाळाला ट्रान्सिएन्ट पल्मोनरी हायपरटेन्शनची शक्यता वर्तविल्यामुळे स्लाईडेनाफिल सुरु करण्यात आले. बाळाच्या सतत निरिक्षणादरम्यान २टक्के पेक्षा जास्त प्रमाण अनियमित मानले जाणाऱ्या मेथॅमोग्लोबिनची पातळी ३० टक्के दरम्यान आढळल्यानंतर तातडीने बाळाची एचबी इलेक्ट्रोफोरेसिस चाचणी केली. 

या चाचणीमध्ये हिमोग्लोबिन एम मध्ये अनियमितता आढळली नाही. मात्र एन्झायम्स अनालिसिस अहवालात या बाळात एनएडीएच सायक्लोटोम बी फाइव्ह रिडक्टेस डेफिशिएन्सी असल्याचे आढळले. वैद्यकीय दृष्ट्या ही बाब अत्यंत दुर्मिळ घटना असल्याने बाळाची आई व वडिल या दोघांचीही हीच चाचणी केली असता दोघांचेही रिपोर्ट नॉर्मल आले. 

दरम्यान, बाळाला इंजेक्शन मिथिनिल ब्ल्यूचे उपचार सुरू केले. मेथमोग्लोबिनची पातळी २ टक्के पेक्षा कमी झाली. त्यानंतर बाळाचे एक्सट्युबेशन केले असता, रूम एअरवर ९८ टक्के सॅच्युरेशनसह नियमित श्वासोच्छवास घेण्यास सुरुवात केली. व्हिटॅमिन सी व व्हिटॅमिन ई ची पूरक मात्रा दिल्यानंतर बाळाच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली. काही दिवसांनी बाळाची प्रकृती अपेक्षित स्तरापर्यंत सुधारल्यावर बाळाला घरी सोडण्यात आले. आता महिन्याभरानंतर बाळाची प्रकृती उत्तम असून बाळ हसतखेळत आहे, असे डॉ. गुप्ता यांनी कळविले आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here