एकाच आसन क्रमांकावर दहा ते बारा मोफत पासेसचे नंबर

By Sachin Unhalekar

Twitter: @Rav2Sachin

मुंबई: प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात सुरु असलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत बुधवारी गोंधळ झाला. अंतिम फेरीत एकूण १० नाटक असून प्रेक्षकांना अवघ्या ५० ते ३० रुपयांमध्ये पाहण्याची संधी शासनाने उपलब्ध करुन दिलेली आहे. पण बुधवारी “38 कृष्ण व्हीला” नाटक पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुडुंब गर्दी उसळली आणि त्यात एकाच आसन क्रमांकावर दहा ते बारा मोफत पासेस नंबर देण्याचा महाप्रताप येथे घडला. यामुळे एकाच आसन क्रमाकांवर दहा बारा लोकांनी बसायचे कसे, यातून गोंधळ उडाल्याने स्पर्धेच्या समन्वयकांसोबतच अधिकाऱ्यांशी प्रेक्षकांचे चांगलेच वाजले. 

स्पर्धेच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे बसायला न मिळाल्याने अनेक रसिक नाट्य प्रेमींना निराश होऊन घरी परतावे लागले. तर काहींनी चक्क थिएटर्सच्या पायऱ्यांवर बसून संपूर्ण नाटक पाहिले. आता पासेस वरील नंबराचा झालेला घोळ हा लोकांनीच केला असून यात आमची काहीही चूक नाही, असे म्हणत स्वतःची जबाबदारी झटकण्याचे काम येथील समन्वयकांनी केले आहे.

रवींद्र नाट्य मंदिरात १७ एप्रिल २०२३ पासून महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेची अंतिम फेरीत सुरु झाली आहे. स्पर्धेत ‘सारख काहीतरी होतंय’, ‘खरं खरं सांग’, ’38 कृष्ण व्हीला’, ‘मी स्वरा, आणि ते दोघे’, ”हीच तर फॅमिलीची गंमत’, ‘संज्या छाया’, ‘चारचौघी’, ‘पुनश्च हनिमून’, ‘सफरचंद’, आणि ‘टूरर्रर्रर्र’ अशी एकापेक्षा एक सरस प्रेक्षकांच्या पसंदीचे १० नाटक अंतिम फेरीत आहेत. 

स्पर्धेत परीक्षकांसोबत सर्व नाटकं प्रेक्षकांना अवघ्या ५० ते ३० रुपयांमध्ये पाहण्याची संधी शासनाने उपलब्ध करुन दिलेले आहे. त्यात मोफत पासेस ही सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दिले जातात. 

बुधवारी ’38 कृष्ण व्हीला’ नाटक होते. हे नाटक पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी उसळली. सर्व तिकीटांची विक्री झाली. त्यात मोफत पासेस ही मोठ्या प्रमाणात वाटले गेल्याने हे मोफत पासेस घेऊन ही प्रेक्षकांनी नाट्यगृहात प्रवेश केला. मोफत पासेसवर नाट्यगृहाच्या तिकीट खिडकीवर नंबर टाकून दिले जाते. तसेच सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या अधिकाऱ्यांकडून मोफत पासेसवर नंबर टाकून दिले जाते. बुधवारी तिकीट आणि पासेस घेऊन नाटक पाहण्यासाठी नाट्यगृहात प्रेक्षकांनी प्रवेश केला आणि एकाच आसान क्रमांकावर दहा ते बारा मोफत पासेसचे नंबर टाकून देण्यात आल्याने बसायचे कोणी, असा गोंधळ निर्माण झाला.

बसायलाच न मिळाल्याने नाटक पाहण्याची संधी हुकल्याने प्रेक्षक चिडले. त्यांनी स्पर्धेच्या समन्वयकांसोबतच अधिकाऱ्यांना ही धारेवर धरले. मोफत पासेस ज्यावेळी देता त्याचवेळी त्यावर आसन क्रमांक टाकून देणे आवश्यक आहे. आसन क्षमतेपेक्षा जास्त पासेस वाटल्यानेच हा गोंधळ उडाला आहे. प्रेक्षकांना नाटक पाहू न देता केवळ गर्दी जमविण्याचा उद्देश सांस्कृतिक कार्य संचालनालयाने पार पाडलेला आहे, अशी टीका प्रेक्षक करत आहेत.

गेले काही दिवस आसन क्रमांकाचा गोंधळ उडालेला नव्हता. ’38 कृष्ण व्हीला’ नाटक पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली. नाटक पाहायला मिळावे म्हणून लोकांनीच स्वतः पासेस वर आसन क्रमांक लिहिले. यातूनच गोंधळ निर्माण झालेला आहे. पण पुन्हा अशा प्रकारे आसन क्रमांकाचा गोंधळ होऊ नये म्हणून काळजी घेऊ आणि यावर कशी मात करता येईल, यासंबंधी  मिटिंग घेऊन निर्णय घेऊन पाऊले उचलून कारवाई करु, असे सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here