जागतिक रक्तदाता दिन विशेष

मुंबई: सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील विक्रम यादव यांनी रक्तदानाची चळवळ जागतिक पातळीवर नेऊन ठेवली आहे. स्वतः दुर्मिळ रक्तगटाचे रक्तदाते म्हणून कार्य करत आहेत. मात्र, दुर्मिळ रक्तगटाच्या व्यक्तिंना एका सुत्रात बांधण्याचे कामही केले आहे. यादव यांनी एकूण ५४ वेळा रक्तदान केले. बॉम्बे रक्तगट (Rare Bombay blood group) हा दुर्मिळ मानला जात असून भारतात या गटातील निव्वळ १७९ जण आहेत. तर जगात २३० नागरिक आहेत. या २३० जणांचा बॉम्बे रक्तगट व्हाट्सग्रुप तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून कुठेही कोणलाही रक्ताची गरज भासल्यास त्या ठिकाणी धाव घेऊन मदत केली जात असल्याचे यादव यांनी सांगितले. आजचा १४ जून हा दिन जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो. त्या पार्श्वभुमीवर चळवळ समुहाचे कार्य सांगण्यात आले.

रक्तदानाच्या चळवळीला यादव यांच्या मित्राच्या अपघाताने सुरुवात झाली. मित्राचा अपघात झाल्याने त्याला रक्ताची गरज होती. सर्व मित्रांनी रक्त मिळविण्यासाठी खूप धावपळ केली. मात्र, त्यावेळी रक्त मिळाले नाही. रक्ताअभावी अपघातग्रस्त मित्राचा मृत्यू झाला. त्यानंतर एकदा यादव रक्तदानासाठी गेले असता डॉक्टरांनी त्यांच्या रक्तगटाची तपासणी केली. त्यावेळी यादव हे दुर्मिळ अशा बॉम्बे रक्तगटाचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यावेळी अपघातग्रस्त मित्राला याच रक्तगटाची गरज होती असल्याचे समजले.

स्वतः बॉम्बे रक्तगटाचा असूनही मित्राचे प्राण वाचवू शकले नसल्याने ते पश्चातापदग्ध झाले. या प्रसंगातून त्यांनी धडा घेऊन दहा मित्रांनी रक्तदान चळवळच उभारण्याचा पण केला. सन १९९५ पासून रक्तदानाच्या कार्याला सुरुवात केली. सध्या या रक्तदानाच्या कार्यात दोन लाख दाते सहभागी असल्याचे यादव यांनी सांगितले.

दरम्यानच्या काळात कित्येकजण पैशाअभावी रुग्णालयापर्यंत पोहचत नसल्याची बाब त्यांच्या ध्यानात आली. यात गंभीर आजारात प्राणही गमवल्याच्या घटना त्यांना समजल्या. गरजूंना मदत करण्यासाठी समुहातील १५ हजार ७३० सभासद प्रत्येकी दहा रुपये निधी जमा करतात. या दहा रुपयांप्रमाणे १५ हजार ७३० सदस्यांचे जमलेले १ लाख ५७ हजार ३०० रुपयांचा निधी त्या गरीब रुग्णाला देण्यात येतो.

२२ राज्यात रक्तदान

विक्रम यादव यांनी आतापर्यंत झारखंड, रांची, आग्रा अशा २२ राज्यात १८ वेळा महाराष्ट्राबाहेर रक्तदान केले आहे. तर प्रत्येक ग्रुप सदस्यांनी ५० ते ६० वेळा जाऊन रक्तदान केले आहे. २२ राज्यात बॉम्बे ब्लड ग्रुपच्या ५७० शाखा कार्यरत आहेत. त्या त्या राज्यातील सदस्यांना रक्ताची गरज सांगितले जाते. ते सदस्य ते ठिकाण गाठून रक्तदान करतात. गरज माहिती पडल्यास एक ते दोन तासात बॉम्बे ब्लड ग्रुप समुह रक्तदान करतो.

सदस्य रक्तदान करत असताना प्रत्येकाला रक्तदान करण्याचे समुपदेशन देखील करतात. भविष्यात रक्तगटाची गरज लागली तर रक्तदान करण्यास असे आवाहन केले जाते. प्रत्येक घरात दोन रक्तदाते असावेत. यातून कोणताही रक्तगटाअभावी एखाद्याचा मृत्यू होणार नाही. रक्तदानाचे महत्व पटवून दिले जाते.

बॉम्बे ब्लड ग्रुप म्हणजे काय?

बॉम्बे ब्लड ग्रुप हा ओ पॉझिटिव्ह रक्तगटच आहे. मात्र यात एच अँटिजेन हा घटक नाही. याचा शोध १९५२ सालात मुंबईत डॉ. के. एम. भेंडे यांनी लावला. त्यामुळे या रक्तगटाला बॉम्बे ब्लड ग्रुप म्हटले जाते. इंग्रजीत या रक्तगटाला ओएचएच रेअर ब्लड ग्रुप असे म्हटले जाते. हा इतर रक्तगटाला जुळत का नाही यावर संशोधन झाले त्यातून एच अँटिजेन नसल्याचे समजले. त्यामुळे याला दुर्मिळ रक्तगट म्हटले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here