वीर सावरकरांच्या अपमानाबद्दल काँग्रेसने देशाची माफी मागावी : देवेंद्र फडणवीस

@maharashtracity

मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांची दिल्ली उच्च न्यायालयाच्या निरीक्षणानंतर चौकशी होत असेल तर त्याला सामोरे जायला हवे. सामान्य जनतेला अकारण वेठीस धरण्याचा प्रयत्न करु नये. काँग्रेसच्या या कृतीचा आम्ही निषेध करतो, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले आहे.

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना ईडी चौकशीसाठी बोलाविले असताना आज काँग्रेस पक्षाने विविध शहरात जनतेला वेठीस धरले. ही चौकशी न्यायालयाच्या निर्णयानंतर झाली आहे. एजेएल ही कंपनी 1930 च्या दशकात 5000 स्वातंत्र्य सैनिकांनी एकत्र येत स्थापन केली. मात्र, 2010 मध्ये यंग इंडिया कंपनीची (Young India Company) स्थापना करीत या कंपनीचे सर्व समभाग हस्तांतरित करण्यात आले आणि सुमारे 2000 कोटी रुपयांची मालमत्ता हडप करण्यात आली. हा प्रश्न न्यायालयात गेला तेव्हा 2019 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने अतिशय गंभीर आक्षेप त्यावर नोंदविले आहेत आणि हा भ्रष्टाचार आहे, असे सांगितले आहे.

पण, आज जणू आपण निर्दोष आहोत, असे भासविण्याचे काम होते आहे. काँग्रेसने (Congress) बाऊ करण्याऐवजी चौकशीचा थेट सामना करावा. आमचे आदर्श स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantrya Veer Sawarkar) यांनी जन्मठेपेच्या 2 शिक्षा भोगल्या. आज त्यांच्याविरोधात फलकं लावून राहुल गांधी आणि काँग्रेस त्यांचा अपमान करते आहे. स्वतः 2000 कोटी रुपयांची मालमत्ता हडप करायची आणि वीर सावरकर यांचा अपमान करायचा, हे निषेधार्ह आहे. त्यांनी देशाची माफी मागायला हवी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here