@maharashtracity

मुंबई: मुंबई महापालिकेच्या ४ आयुर्वेदिक दवाखान्याला (Ayurvedic clinic) चांगला प्रतिसाद मिळत आहे. आयुर्वेदिक औषधोपचाराचा साईड इफेक्ट् होत नसल्याने रुग्ण आयुर्वेदिक दवाखान्यात उपचारासाठी धाव घेत आहेत. यास्तव, एल्फिन्स्टन व प्रभादेवी येथील आयुर्वेदिक दवाखान्यासाठी दहा लाख रुपयांच्या औषधांची खरेदी करण्यात येत आहे.

त्यासाठी टेंडर प्रक्रिया पालिकेकडून करण्यात आली आहे. त्यास योग्य प्रतिसाद देऊन पात्र ठरणाऱ्या औषध पुरवठादाराला कार्यादेश मिळताच सदर औषधांचा पुरवठा करण्यात येणार आहे.

मुंबईत सीएसएमटी येथील महापालिका मुख्यालयात नवीन इमारतीत पहिल्या मजल्यावर आयुर्वेदिक दवाखाना सुरू आहे. या ठिकाणी पालिका कर्मचारी, अधिकारी हे विविध आजारांवर औषधोपचार घेतात. त्याचप्रमाणे, अंधेरी, प्रभादेवी व एलफिन्स्टन या आणखीन तीन ठिकाणी असे एकूण ४ ठिकाणी आयुर्वेदिक दवाखाना सुरू आहे.

या चारही आयुर्वेदिक दवाखान्यात दररोज कर्मचारी, अधिकारी, नागरिक हे उपचार घेत असतात. या दवाखान्यात पोटदुखी, डोकेदुखी, संधिवात, आम्लपित्त, जुने आजार आदींवर या आयुर्वेदीक दवाखान्यात तज्ज्ञ डॉक्टरांकडून औषधोपचार दिला जातो.

पालिकेच्या प्रभादेवी व एल्फिन्स्टन या दोन्ही दवाखान्यात मिळून दररोज १०० – १५० रुग्ण विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी येत असतात. यामध्ये, कर्मचारी, नागरिक, ज्येष्ठ नागरिक हे या आयुर्वेदिक दवाखान्यात उपचार घेत असतात. त्यामुळे आयुर्वेदिक दवाखान्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सध्या शहर भागात तीन, पश्चिम उपनगरात एक असे चार आयुर्वेदिक दवाखाने सुरू आहेत. त्यांना मिळणारा चांगला प्रतिसाद पाहता पालिकेने पूर्व उपनगरातही दवाखाने सुरू करायला हवेत, अशी मागणी नागरिकांकडून येऊ लागली आहे. मात्र अनेकांना या आयुर्वेदिक दवाखान्याबाबत पुरेशी माहिती नाही. त्यामुळे पालिकेने या आयुर्वेदिक दवाखान्याबाबत जनजागृती करायला पाहिजे व दवाखान्यांची संख्या वाढवायला पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here