निवृत्त सैनिकाने पर्यटकांसाठी नाविन्य उपक्रम

@maharashtracity

महाड: महाबळेश्वरला ऐन उन्हाळ्यात थंडीची अनुभूती घेण्यासाठी लाखो पर्यटक भेट देतात. या पर्यटकांसाठी पोलादपूर – महाबळेश्वर हा जवळचा मार्ग आहे. ऐन पावसाळ्यात या घाटातील निसर्गाची अनुभूती वेगळीच. हे निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी घाटातील एका वळणावर दुर्बीण लावून बसलेल्या निवृत्त सैनिकाने एक वेगळीच संधी उपलब्ध केली आहे. घाटाच्या पायथ्याशी असलेल्या गावांचा आणि परिसर या दुर्बिनेने अगदी जवळून न्याहाळता येणे शक्य होत आहे.

पोलादपूर – महाबळेश्वर (Mahabaleshwar) घाटात रायगड आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वाडा गावातील निवृत्त सैनिक हरी कोंडीराम सकपाळ यांनी सेवानिवृत्तीनंतर उत्पन्नाचा एक वेगळा मार्ग उपलब्ध केला. घाटात बावली गावाजवळ एका वळणावर यांनी एक दुर्बीण (binocular) लावली आहे. या दुर्बिणीतून घाटाच्या पायथ्याशी असलेल्या पोलादपूर तालुक्यातील करंजे, लहुळसे, घागरकोंड, शेजारील डोंगरापलीकडे असलेला रायगड, चंद्रगड असे किल्ले (forts) आपल्या सामान्य नजरेतून स्पष्ट दिसत नाहीत. मात्र हे किल्ले आणि पायथ्याशी असलेली गावे, नद्या, निसर्ग दुर्बिणीतून स्पष्टपणे न्याहाळणे सकपाळ यांच्या दुर्बिणीतून शक्य होत आहे.

सैन्यातून सेवानिवृत्त असलेले हरी सकपाळ यांनी आपल्या सेवेत असताना दुर्बिणीचे तंत्र जाणून घेतले आहे. यामुळे त्यांनी इतर लोकांप्रमाणे पर्यटकांसाठी हॉटेल, पानटपऱ्या, साहित्य विक्रीचा व्यवसाय न करता पर्यटकांना या निसर्गाची अनुभूती घेता यावी, शेजारील परिसर पाहता यावा, या हेतूने दुर्बीण लावून बसण्याचा निर्णय घेतला. एका वळणावर उभे राहता येईल एव्हढे छोटे बांधकाम केलेले आहे. या ठिकाणाहून पोलादपूर आणि परिसर पाहताना पर्यटक देखील आनंदी होत आहेत.

आपल्या डोळ्यांनी दूर दिसणारा डोंगर अस्पष्ट दिसत असला तरी पर्यटक (tourist) घाटात थांबून या निसर्गाचा आनंद घेतात. अशा पर्यटकांना गावातील आणि परिसरातील निसर्ग सौंदर्य सहज पाहता यावे यासाठी दुर्बीण महत्वाची असते. ऐन पावसाळ्यात दुर्बिणीतून दृष्टीस पडणारे निसर्ग सौंदर्य काहीं औरच असते. हरी सकपाळ यांनी ना नफा ना तोटा या तत्वावर हा उपक्रम सुरू केला आहे. पर्यटकानी दुर्बिणीचा अनुभव घेतल्यानंतर जे देतील ते घ्यायचे अशा पद्धतीने हरी सकपाळ याठिकाणी काम करत आहेत.

आलेल्या पर्यटकांना दुर्बीण स्थिर करून देत पोलादपूर परिसर आणि शेजारील गडकिल्ले याची माहिती देखील देण्याचे काम करत आहेत. हरी सकपाळ यांनी उपलब्ध केलेल्या दुर्बिणीच्या नजरेतून निसर्ग सौंदर्य न्याहालल्यानंतर समाधान व्यक्त करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here