२५ जूनपासून आरक्षण सुरु

मंत्री, ॲड. अनिल परब यांची माहिती

@maharashtracity

मुंबई: दिनांक ३१ ऑगस्ट २०२२ रोजी श्री गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. कोकणातील (Konkan) चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी (Ganeshotsav) एसटी महामंडळाने यंदा २५ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यान २५०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

पहिल्या टप्प्यात १३०० बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येणार असून दि. २५ जून २०२२ पासून कोकणात जाणाऱ्या गाड्यांच्या आरक्षणाला सुरुवात होणार आहे. तर ५ जुलैपासून परतीच्या गाड्यांचे आरक्षण करता येईल. मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब (Adv Anil Parab) यांनी आज दिली. कोकणात जाणाऱ्या जास्तीत जास्त चाकरमान्यांनी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही मंत्री, ॲड.परब यांनी केले.

गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना, गणपती बाप्पा व कोकणचा चाकरमानी यांचे एक अतुट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. यंदा सुमारे २५०० जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील, असे मंत्री ॲड. अनिल परब यांनी सांगितले.

गणेशोत्सवासाठी २५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान या गाड्या कोकणात रवाना होतील. तर ५ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर दरम्यान या गाड्या कोकणातून परतीच्या प्रवासाला निघतील. या बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या असून, सदर बसेसचे आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या संकेत स्थळावर, मोबाईल ॲपव्दारे, खाजगी बुकींग एजंट व त्यांचे ॲपवर उपलब्ध होणार आहे, असेही ॲड.परब यांनी सांगितले.

गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार आहेत.

येथून सुटणार गाड्या…

मुंबई सेंट्रल – मुंबई सेंट्रल, साईबाबा, काळाचौकी, गिरगांव, कफपरेड, केनेडी ब्रीज, काळबादेवी, महालक्ष्मी.
परळ – परळ, सेनापती बापट मार्ग दादर, मांगल्य हॉल जोगेश्वरी
कुर्ला नेहरूनगर – कुर्ला नेहरूनगर बर्वे नगर/सर्वोदय हॉ.(घाटकोपर), टागोरनगर विक्रोली, घाटला (चेंबूर), डि.एन नगर अंधेरी, गुंदवली अंधेरी, सांताक्रुझ (आनंदनगर), विलेपार्ले, खेरनगर बांद्रा, सायन.
पनवेल – पनवेल आगार
उरण – उरण आगार
ठाणे १ – भाईंदर, लोकमान्य नगर, श्री नगर, विटावा, नॅन्सी कॉलनी (बोरिवली), मालाड, डहाणूकरवाडी/ चारकोप (कांदिवली), महंत चौक (जोगेश्वरी), संकल्प सिद्धी गणेश मंदीर (गोरेगाव)
ठाणे २ – भांडूप (प.) व (पू.), मुलुंड (पू.)
विठ्ठलवाडी- विठ्ठलवाडी, बदलापूर, अंबरनाथ
कल्याण- कल्याण, डोंबिवली (प.) व (पू.)
नालासोपारा – नालासोपारा,
वसई – वसई आगार
अर्नाळा- अर्नाळा आगार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here