महाड तालुक्यातील दरडग्रस्त वाऱ्यावर?
By Milind Mane
Twitter : @manemilind70
महाड: महाड तालुक्यात दरडींची संख्या प्रतिवर्षी वाढत असून यावर्षी महसूल विभागाने जाहीर केलेल्या यादीप्रमाणे सुमारे ७२ गावांमध्ये भूस्खलन होऊन दरड कोसळण्याची शक्यता आहे. यातील ४८ गावे अतिधोकादायक स्थितीत आहेत. गेले महिनाभर महसूल प्रशासनाचे किल्ले रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा आणि जबाबदार अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्या यात या आपत्कालीन व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे महाड तालुक्यातील दरडग्रस्त धास्तावले असून प्रशासनातील अधिकारी सुस्तावले आहेत तर जनतेचे कैवारी म्हणणारे पुढारी मस्तावले असल्याची चर्चा दरडग्रस्त गावांमधील नागरिकांकडून ऐकण्यास मिळत आहे.
महाड तालुक्यात २० वर्षापूर्वी पारमाची गावात दरड कोसळली होती. त्यानंतर महाड तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागात राहणाऱ्या गावांमध्ये दरडी कोसळण्याचे सत्र सुरू झाले. सन २००५ मध्ये दासगाव, जुई आणि कोंडीवते, रोहन याचबरोबर पोलादपूर तालुक्यातील काही गावात दरड कोसळून जीवितहानी वित्तहानी झाली होती. महाड तालुक्यात दरवर्षी पावसाळ्यात विविध ठिकाणी डोंगर भागात आणि रस्त्यावर दरडी येण्याच्या घटना सुरूच असतात. तालुक्यातील सह्याद्री वाडी, हिरकणी वाडी, पारमाची, माझेरी या गावांतून जमिनीला भेगा पडण्याच्या घटना देखील घडल्या होत्या. याबाबत भूवैज्ञानिक शाखेकडून तालुक्यातील गावांची पाहणी करण्यात आली होती. त्यावेळी महाडमधील ४९ गावांना दरडीचा धोका असल्याचे निरीक्षण करण्यात आले होते.
महाड तालुक्यातील दुर्गम डोंगराळ भागात मागील काही वर्ष महाड महसूल प्रशासन या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा म्हणून या गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर होण्याचे सांगत आहे. महाडमधील ४९ दरडग्रस्त संभाव्य गावातील ग्रामस्थांना स्थलांतर होण्याबाबत महाड महसूल विभागाकडून नोटीसा देण्यात येतात. महाड तालुक्यात सद्य स्थितीत ७२ गावे संभाव्य दरडग्रस्त यादीत असून यातील ४८ गावे अतिधोकादायक असल्याचे जाहीर केले आहे. जाहीर केलेल्या गावांमधून महसूल प्रशासनाने नेहमीप्रमाणे अद्यापपर्यंत नोटीस बजावली नाही, तसेच नागरिकांनाही अद्याप स्थलांतर होण्याबाबत कोणत्याच सूचना देण्यात आलेल्या नाहीत. याला कारण महाड तालुक्यात किल्ले रायगडावर 350 वा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्याच्या प्रयत्नात जिल्हाधिकारी कार्यालयापासून जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा रायगडावरील तिथी प्रमाणे व तारखेप्रमाणे साजरा होणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्याच्या तयारी पूर्ण मे महिना व्यस्त झाल्याने तसेच संभाव्य पावसाळा तोंडावर आला असताना व महाड तालुका दरडग्रस्त असल्याची कल्पना असून देखील या गोष्टीकडे प्रशासनासहित राजकीय लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने दरडग्रस्त गावातील नागरिक ऐन पावसाळ्याच्या तोंडावर हातबल झाले आहेत.
महाड तालुक्यात दरवर्षी ऐन पावसाळ्यापूर्वी प्रशासन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत या गावात नागरिकांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्याचे काम देखील करते. त्याचप्रमाणे शहर आणि गावांमधून नागरिकांच्या जीव वाचवण्यासाठी लागणारी साधने, होड्या, संरक्षित साधने, इत्यादी साधने देण्याबाबत तसेच त्या बाबतीत प्रशिक्षण देखील अद्याप प्रशासनाकडून देण्यात आलेले नाही किंवा याबाबत एकही बैठक तहसीलदार अथवा उपविभागीय दंडाधिकारी प्रांत यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेले नाही. महाड तालुक्यात संभाव्य दरडग्रस्त गावातील नागरिकांना कायमस्वरूपी निवारा शेडकरिता ५२ गावांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. हा ८१ कोटी ५० लाखाचा प्रस्ताव असून वलंग, करंजखोल आणि आडराई या ठिकाणी १ कोटी १६ लाखाचा प्रस्ताव आहे. याकरिता ३९ खाजगी तर १३ सरकारी जागा संपादन केल्या जाणार आहेत.
महाड नगरपालिकेने शहरातील शाळा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह, चवदारतळे, माता रमाई विहार त्याचबरोबर ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा, समाजमंदिर या ठिकाणी स्थलांतर करण्याचे निश्चित केले आहे, अशी माहिती महसूल विभागाने दिली आहे.
स्थलांतर होण्याच्या सूचना दिलेली गावे
तुडील, टोळ खु, मोरेवाडी (शिंगरकोंड), आंबिवली पातेरेवाडी, कोंडीवते, मुठ्वली, चांढवे खु, सव, रोहन, पुनाडे, कोथेरी जंगमवाडी, पाचाडवाडी, मुमुर्शी बौद्धवाडी, चोचींदे, गोठे बु, पारमाची, आदिस्ते, खैरे, वाळण, रेवतळे मानेची धार, मोहोत, वराठी, कुर्ले दंडवाडी, आंबेनळी, वामने, टोळबु, नवीन कोंडीवते, पिंपळकोंड, वलंग, शेलटोली, मुमुर्शी गावठाण, कुंबळे, चोचींदे कोंड, वीर, मुमुर्शी आंब्याचा कोंड, तळोशी, बिरवाडी वेरखोले, करंजखोल, सांदोशी हेटकरकोंड, वीर मराठवाडी.