@maharashtracity

धुळे: धुळे जिल्हा पोलिस दलातर्फे अवैधपणे गावठी पिस्तुल अग्नी शस्त्रे बाळगणार्‍या आणि त्याची अवैध खरेदी विक्री करण्याच्या विरुध्द धडक कारवाई सुरु केली आहे. यात शनिवार, रविवार असे दोन दिवसात तीन पिस्तुले हस्तगत करीत चार जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

आझादनगर पोलिसांनी धुळे शहरातील मार्केट कमेटी आवारात कारवाई करीत गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या दोघांना रंगेहाथ पकडले. रविवारी रात्री ९ वाजेनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आर्वी ता.धुळे येथील एकाकडून पिस्तुल हस्तगत केले आहे. तर चाळीसगांव रोड पोलिसांनी गावठी पिस्तुलासह फोटो काढणार्‍याकडून एक पिस्तुल जप्त केले.

धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत अवैध गावठी पिस्तुल विक्रीसाठी दोघे येणार असल्याची गुप्त माहीती मिळाली. त्यानुसार, आझाद नगर पोलिस ठाण्याचे पो नि आनंद कोकरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने हमालाचा वेश धारण करुन रविवार दि. ११ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्याच्या शेड जवळ मोटरसायकवरुन आलेल्या मोहम्मद इरफान मोहम्मद कौसर अन्सारी (वय ४१) रा.आझाद नगर, वडजाई रोड, धुळे याला आणि साहील सत्तार शाह (वय २०) रा. रामदेव बाबा नगर, धुळे दोघांना पकडले.

त्यांची झडती घेतली असता मोहम्मद अन्सारी याच्याकडे एक सिल्वर रंगाचे गावठी बनावटीचे पिस्टल मिळून आले. तसेच एक जिवंत काडतुस, मोबाईल, आणि ३० हजाराची मोटरसायकल असा एकुण ४६ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पो कॉ जयेश भागवत यांनी फिर्याद दिली. दोघांच्या विरुध्द आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, आर्वी ता.धुळे येथील शासकीय रुग्णालयाजवळ राहणार्‍या तरुणाकडे अवैध गावठी पिस्तुल असल्याची माहिती मिळाल्याने धुळे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा अर्थात एलसीबी पथकाने दि. ११ रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास छापा टाकला. अनकवाडी रोडवरील सिव्हील हॉस्पिटलच्या मागे राहणार्‍या तुषार शिवाजी शेगर (वय २२) याला गावठी पिस्तुला विषयी विचारणा केली असता त्याने आधी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी हिसका दाखवताच २५ हजार रुपये किंमतचीे गावठी बनावटीचे स्टील बॉडी असलेले पिस्तुल काढून दिले. त्याच्याकडून पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात पो कॉ विशाल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तुषार शेगर विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच शहरातील कबीरगंज परिसरातील तरुणाने गावठी पिस्तूलसह काढलेला फोटो प्रोफाइलवर ठेवला होता. हा फोटो पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर तरुणाला शनिवारी रात्री ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी चाळीसगावरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कबीरगंज परिसरातील रहेमत मशिदीजवळ राहणारा मोबीन शेख गुलाम गौस (वय २१) याने पिस्टलसह फोटो काढला होता. हा फोटो पोलिसांना मिळाला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. बोलते केल्यावर त्याने लोखंडी पेटीमधून गावठी कट्टा काढून दिला. याप्रकरणी चाळीसगावरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस अधिकारी संदीप पाटील यांच्या पथकातील उपनिरीक्षक योगेश ढिकले, विजय चौरे, कर्मचारी अजिज शेख, भुरा पाटील, मुख्तार शाह, हेमंत पवार, संदीप वाघ, सोमनाथ चौरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here