@maharashtracity

मुंबई: मुंबई अग्निशमन दल (Fire Fighting department) हे त्यांच्या ऐतिहासिक , धडाकेबाज कामगिरीसाठी प्रसिद्ध आहे. पोलिसांप्रमाणेच मुंबई अग्निशमन दल हे २४ तास आपल्याला सेवेला, कर्तव्याला बांधील असतात. हिवाळा, उन्हाळा असो की पावसाळा असो अग्निशमन दल आपली कामगिरी चोखपणे पार पाडतात.    

अशा या मुंबई अग्निशमन दलाच्या भायखळा येथील मुख्य कार्यालयात आज अनपेक्षित पण या जवानांचा अभिमान वाटावा अशी घटना घडली. अग्निशमन दलाचा कार्यभार ज्यांच्या अखत्यारित येतो त्या मुंबई महापालिका (BMC) अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे (Ashwini Bhide) यांना आज या केंद्रात मानवंदना देण्याचा कार्यक्रम भर पावसात पार पडला. अतिरिक्त आयुक्त भिडे या छत्रीखाली सुरक्षितपणे मानवंदना स्वीकारीत होत्या तर जवान मात्र भर पावसात भिजत त्यांना मानवंदना देत असल्याचे निदर्शनास आले.    

त्यामुळे पालिका वर्तुळात वेगळ्या चर्चेला तोंड फुटले आहे. अतिरिक्त आयुक्त भिडे या पावसापासून सुरक्षितपणे छत्रीखाली होत्या मात्र त्यांना आपल्या अग्निशमन दलाच्या जवानांना मानवंदना देण्यासाठी भर पावसात कसे काय भिजू दिले ? त्याबाबत त्यांना जवानांची काहीच दया आली नाही का ? पाऊस थांबल्यानंतरही मानवंदनाचा कार्यक्रम करता आला नसता का ? अशा चर्चेला उधाण आले.

तर अग्निशमन दलाचे जवानांनी मुसळधार पावसातच जवानांनी परेड करीत त्यांना मानवंदना दिली. विशेष म्हणजे अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी हेमंत परब सोबत अन्य अधिकारी ही पावसात भिजत उभे होते.    

हे जवान पावसाची तमा बाळगता पावसात चिंब भिजले. मात्र, त्यांनी आपला मानवंदना देण्याचा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पाडला म्हणून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.    

या मानवंदनेच्या कार्यक्रमानंतर, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी, अग्निशमन दलातील साहित्य आणि उपकरणे यांची पाहणी करीत माहिती जाणून घेतली. तसेच कामकाज कसे चालते, याची माहिती ही यावेळी अश्विनी भिडे यांना अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी करून दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here