@maharashtracity

वर्सोवा येथील कचऱ्याचे प्रमाण ४०० मे.टन वरून ३०० मे.टनवर घसरले
एक टन कचरा उचलण्यासाठी ३६० रुपयांऐवजी २८४ रुपये खर्च येणार
२ वर्षांसाठी नवीन कंत्राटदाराला ६.४६ कोटी रुपये मोजणार

मुंबई: मुंबईत (Mumbai) सध्या कोरोनाचे (corona) वातावरण आहे. या कोरोनाला रोखण्यासाठी पालिकेने विविध उपाययोजनांवर आतापर्यंत अडीच हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त निधी खर्च केला आहे. मात्र याच कोरोनामुळे पालिकेच्या वर्सोवा येथील दररोजच्या कचऱ्याचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे पालिकेचे कचरा उचलण्याच्या कंत्राटकामात तब्बल ४ कोटी रुपयांची बचत होत आहे.

यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.

वर्सोवा भागातून वर्सोवा लगून कचरा हस्तांतरण केंद्रात पूर्वी दररोज ४०० मे.टन इतका कचरा जमा होत असे. मात्र कोरोना कालावधीत या कचऱ्याचे प्रमाण ४०० मे.टन वरून थेट २०० मे. टनावर घसरले. त्यामुळे पालिकेने मागील दोन वर्षांसाठी नेमलेल्या कंत्राटदाराच्या कंत्राट रकमेत म्हणजे कचऱ्याचे प्रमाण कमी धरून ४ कोटींची कपात करण्याचा निर्णय घेतला. मात्र पालिका आयुक्तांनी ही ४ कोटी रुपयांची रक्कम कंत्राटकामातून वजा न करता त्या कंत्राटदाराला नवीन कंत्राटदाराची नियुक्ती होईपर्यंत पुढील ६ महिन्यांसाठी मुदतवाढ देऊन त्या बदल्यात काम करवून घेतले. त्यामुळे पालिकेला कचरा घटल्याचा मोठा आर्थिक फायदा झाला.

वास्तविक, पालिकेने वर्सोवा येथील लगून कचरा हस्तांतरण केंद्रात दररोज जमा होणारा ४०० मे. टन कचरा उचलून देवनार व कांजूर डंपिंग ग्राउंडवर (dumping ground) वाहनाद्वारे टाकण्यासाठी प्रति १ मेट्रिक टन कचऱ्यासाठी ३६० रुपये दर याप्रमाणे २ वर्षांसाठी म्हणजे ७३० दिवसांसाठी १०.५१ कोटी रुपये अधिक ४% सादिलवर खर्च धरून एकूण १०.९३ कोटी रुपये देण्याचे कंत्राटकाम मंजूर केले होते.

कोरोना कालावधीत कचऱ्याचे प्रमाण ४०० मे. टन वरून घसरून थेट २०० मे. टन झाल्याने व ते पालिकेच्या निदर्शनास आल्याने प्रशासनाने या कंत्राटदाराच्या कंत्राट रकमेत ४ कोटी रुपये कपात करण्याचा निर्णय घेतला. मात्र कंत्राट करारानुसार कंत्राट कालावधी वाढवून कंत्राट रकमेची भरपाई करण्याच्या इराद्याने पालिका आयुक्त यांनी कंत्राटदाराला देय रक्कम तशीच ठेवत त्याच्याकडून पुढील सहा महिने आणखीन कंत्राटकाम करून घेतले. त्यामुळे कोरोनाच्या प्रादुर्भावाचा अपलाभ कंत्राटदाराला घेऊ न देता पालिकेचा ४ कोटींचा फायदा झाला. आयुक्त यांनी त्यात तडजोड करून घेत कंत्राटदाराला अधिक सहा महिने काम करायला सांगून त्या ४ कोटिची बचत भरून काढली.

नवीन कंत्राटकामातही ४ कोटींची बचत

आता पुन्हा याच वर्सोवा येथील कचरा उचलण्याच्या कामासाठी म्हणजे पुढील दोन वर्षासाठी पालिकेने टेंडर काढले असता त्यास सात कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला. मात्र मे.सिल्की इंटरप्रायजेस या कंत्राटदाराने पालिकेने अंदाजित ठरवलेल्या दरापेक्षाही २८.४६% कमी दर भरल्याने त्याला पात्र ठरविण्यात आले आहे.

त्याने दररोज ३०० मे. टन कचरा उचलण्यासाठी प्रति मे. टन २८४ रुपये दराप्रमाणे ७३० दिवसांसाठी ६ कोटी २१ लाख रुपये एवढी कंत्राट रक्कम आकारण्याचा आणि त्यात ४% सादिलवर खर्च २४.८७ लाख रुपये धरून एकूण कंत्राट रक्कम ६ कोटी ४६ लाख रुपये आकारणार असल्याचे प्रस्तावात नमूद केले आहे. त्यामुळे मागील कंत्राट दर व एकूण कंत्राट रक्कम याची तुलना या नवीन कंत्राटकामाशी केल्यास कोरोनामुळे कचऱ्याच्या प्रमाणात मोठी घट होऊन पालिकेचे कंत्राट कामात आणखीन ४ कोटी रुपयांची बचत होत आहे.

म्हणजेच कोरोनामुळे कचऱ्याच्या कंत्राट कामात गेल्या कंत्राट कामात ४ कोटी रुपये वाचले. तर आता नवीन कंत्राटकामातही आणखीन ४ कोटींची म्हणजेच एकूण ८ कोटी रुपयांची बचत झाली होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here