By अरुंधती दीक्षित

@ArundhatiDixit2

काल रात्री मॉरिशसचे (Mauritius) पूर्व राष्ट्रपती व पूर्व पंतप्रधान सर अनिरुध (Sir Anerood Jugnauth ) जगनाथ कालवश झाले ही बातमी आली. भारताचे (India) मॉरिशसबरोबर अत्यंत सलोख्याचे संबंध आहेतच. शिवाय अनिरुध जगनाथ ह्यांच्यासोबतही भारताच्या पंतप्रधानांचे वैयक्तिक संबंधही कायम सलोख्याचे होते. आज त्यांना श्रद्धांजली म्हणून, मॉरिशच्या दुःखात भारतही सहभागी आहे; ह्याच्या प्रतीकस्वरूपात घरासमोरील मंत्रालयावरचा झेंडा अर्ध्यावर फडकत आहे. ह्या सर्व पार्श्वभूमीवर मला 2005 ला राष्ट्रपती अनिरुध जगनाथ ह्यांची भेट आठवली.

मॉरिशसची राजधानी पोर्ट लुई (Port Lui) आपल्या दादरएवढी (Dadar) असेल. पोर्ट लुईला तेथील फुटपाथवरून चालतांना एका दरवाजासमोर कायम एक रुबाबदार गणवेश घातलेला तडफदार पोलिस गार्ड उभा दिसे. वरती चक्क Prime minister of Mauritius अशी पाटी पाहिल्यावरही परत परत वाचली. इतर सामान्य कचेर्‍यांसारखं पंतप्रधानांचं कार्यालयही सहज फुटपाथवरून जाता जाता रस्त्याच्या कडेला दिसावं याचं अप्रूप वाटलं.

येथील त्यावेळचे प्रेसिडेंट सर अनिरुध जगनाथ त्यांच्याच खासगी घरात राहणे पसंत करत. जेंव्हा कधी दुसर्‍या देशाचे पाहुणे येणार असतील किंवा कोणी खास पाहुण्यांसाठी जेवण, किंवा काही समारंभ ठेवला असेल तेंव्हा तेवढ्या वेळेपुरते ते राष्ट्रपतिभवनात येत. अनेक वेळा प्राईम मिनिस्टर किंवा प्रेसिडेंट गाडीतून जातांना दिसायचे. त्यांच्या गाडीच्या पुढे-पाठी पायलट गाड्यांचा ताफा सोडाच फक्त एक पुढे व एक मागे असे दोन मोटरसायकल-स्वार असतं. मोटरसायकलला कडेला लावलेल्या उभ्या दांडीवर लाल दिव्यामुळे कोणी VIP जात आहे एवढं कळे. त्यांच्या गाडीला लाल दिवा नसे.

दर मंगळवारी येथील parliament session (संसदेची बैठक) असे. मॉरिशसच्या पंतप्रधानांचं साधंसुधं ऑफिस जाता जाता रस्त्यावरच पहायला मिळालं. प्रेसिडेंट राहतात ते The State House खूप सुंदर आहे हे ऐकून होतो आणि अचानक तेही पहायला मिळालं.

राष्ट्रपति भवन The State House

मॉरिशसला असतांना 2005 ला श्री अनिरुध जगनाथ हे तेथील प्रेसिडेंट होते. त्यांनी एका चहापानाच्या कार्यक्रमानिमित्त निमंत्रण दिल्याने माॅरिशसच्या राष्ट्रपती भवनाला भेट देता आली.
1982 ते 1995 आणि परत 2000 ते 2003 अशा काळात अनिरुध जगनाथ हे माॅरिशसचे पंतप्रधान राहिले होते. 18 वर्ष पंतप्रधान राहिलेला हा राजकीय नेता मॉरिशियन लोकांमधे रँबो ह्या नावाने प्रसिद्ध होता. (Rambo is a film character known to be unbeatable) 8 सार्वत्रिक निवडणुकांपैकी 7 निवडणुका जिंकण्याचा विक्रम त्यांच्या नावावर होता. आम्ही तेथे असतांना मात्र ते मॉरिशसचे निवडून आलेले राष्ट्रपती होते.

इतका वलयांकित नेता प्रत्यक्षात मात्र अत्यंत शांत व साधा होता. बेताची उंची, अत्यंत साधेपणाने राष्ट्रपती आणि त्यांच्या पत्नी सरोजिनीबाला सर्वांना भेटत होत्या. मलाही सहजपणे सरोजिनीबालांबरोबर बोलण्याची संधी मिळाली. मॉरिशसमधील काही प्रख्यात लोकांच्याही त्यानिमित्ताने गाठीभेटी होत होत्या.

रिझवी, मोका (Réduit, Moka,) च्या एका हिरव्यागार पाचूच्या घळीत डोंगराचा एक आडवा कडा सरळ दरीतच घुसला आहे. आपल्या टकमक टोकासारखा. याच कड्यावर 240 एकरामधे The State House (French: Le Château de Réduit) हा फ्रेंचांनी बांधलेला किल्ला दिमाखात उभा दिसतो. एकेकाळी फ्रेंचांनी शत्रूपासून संरक्षण म्हणून बांधलेला हा किल्ला नंतर Governor House म्हणून वापरला जात असे तर आता राष्ट्रपती भवन (State House ) म्हणून वापरला जातो.

या प्रचंड परिसरात अनेक प्रकारची झाडं अत्यंत कौशल्याने लावलेली आहेत. मॉरिशसची काही दुर्मिळ झाड, जगातील विविध भागातून आणलेली सुंदर सुंदर झाडं, यांच्या जोडीने असलेला औषधी वनस्पतींचा स्वतंत्र विभाग आणि सर्वत्र पसरलेली हिरवीगार हिरवळ पायांना थकल्याची जाणीवही होऊ देत नाही. इथेच मी कापराचे भव्य झाड पाहिले.

या सुंदर कड्यावरून दरीच्या अंतरंगात डोकावतांना `कनकधारा’ स्तोत्रातील लक्ष्मीच्या नजरेची आठवण मला येत असे. निद्रिस्थ शेषशायी भगवंताचं सौंदर्य सतत बघतच रहावं असं सुंदर आहे. त्यांच्या त्या सौंदर्याकडे लक्ष्मी एकटक बघत असतांना तिच्या त्या निळसर काळ्या नजरेच्या सतत प्रवाहाने जणु विष्णुच्या गळ्यामधे असलेली पांढरी शुभ्र मोत्याची माळही तिच्या प्रेमळ दृष्टीत भिजून नीलार्द्र झाली.

दृष्टि तुझी मधुकरासम नीलवर्णी
झाली स्थिराचि मधुसूदन वक्षभागी
दृष्टिप्रभा भिजवि मौक्तिकमाळ वक्षी
नीलार्द्र नील कमलासम नील झाली॥
‘दृष्टी-सुधा-सुमन-माळ’ चि पद्मजा गे
साफल्य देउनि कृतार्थ करी सदा गे।।5

इथेही त्या गर्द हिरवाईत खोल खोल बुडलेली आपली दृष्टी अशीच शांत, पारदर्शी होते. मनातील सर्व विचार शांतपणे कुठेतरी तळाला बसून जातात. सर्वत्र स्वच्छता ही तर मॉरिशसची खरीखुरी लक्ष्मीच म्हटली पाहिजे. मॉरिशसला प्रत्येक ठिकाणी गेल्यावर एखाद्या भारून टाकणार्‍या मंत्रासारखे तेथील नागरिकांचे शब्द माझ्या मनात घुमत राहत,

“आम्ही अमच्या देशाचा कोपरा न् कोपरा सुंदर बनवितो.’’

आज सर अनिरुध जगनाथ जाण्याने मलाही दुःख झाले व मॉरिशसच्या जनतेच्या दुःखात आम्हीही सहभागी आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here