@maharashtracity

मुंबई: मुंबई महापालिका (BMC) पूर्व उपनगरातील हिरानंदानी संकुलातील (Hiranandani Complex) श्रीमंत लोकांसाठी पवई तलावाचे सुशोभीकरण, सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. याठिकाणी जॉगिंग ट्रॅक (Jogging Track), सायकल ट्रॅक (Cycle track) तयार करण्यात येत आहे. तसेच, या तलावातील जलपर्णी, तरंगता कचरा काढण्यासाठी पालिका लवकरच एक कंत्राटदाराची नेमणूक करणार आहे.

या कंत्राटदाराने हा कचरा यांत्रिक पद्धतीचा वापर करून बाहेर काढून त्याची डंपिंग ग्राउंडवर विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करायची आहे.

यासाठी टेंडरप्रक्रिया पालिकेने सुरू केली आहे. यापूर्वीही पालिकेने या तलावातील जलपर्णी काढण्यासाठी व तलाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी कंत्रादाराकडून काम करवून घेतले होते. मात्र या तलावांत जलपर्णी, सांडपाणी मिश्रित होणे, तरंगता कचरा आदी समस्या कायम आहेत.

या तलावाच्या सुशोभिकरणाचा ध्यास राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी घेतला आहे. त्यामुळेच या तलावाच्या कामाकडे पालिका प्रशासन जातीने लक्ष देत आहे.

पवई तलाव हा मुंबई क्षेत्रातील कृत्रिम तलावापैकी एक महत्त्वाचा तलाव आहे. १८९० मध्ये ४० लाख रुपये खर्चून हा कृत्रिम तलाव बांधण्यात आला आहे.

पवई तलावातील पाणी हे क्षारयुक्त असल्याने त्याचा पिण्यासाठी वापर करण्यात येत नाही. ५४५ कोटी लीटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी हे मानवाला पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी वापरले जाते.

पवई तलावाबाबत महत्त्वाची माहिती

मुंबई महापालिका मुख्यालयापासून साधारणपणे २७ किलोमीटर (सुमारे १७ मैल) अंतरावर हा तलाव आहे. या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे ६.६१ किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे २.२३ चौरस किलोमीटर एवढे असते.

तलाव पूर्ण भरलेला असताना तलावामध्ये ५४५.५ कोटी लीटर (५४५५ दशलक्ष लिटर) पाणी असते. हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे मिठी नदीला जाऊन मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here