मानखुर्द उड्डाणपुलाला अखेर छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव ; प्रस्ताव मंजूर
स्थापत्य समिती अध्यक्ष स्वप्निल टेंबवलकर यांचा निर्णय
शिवसेना – भाजपसह विरोधी पक्षाचे एकमत

मुंबई: घाटकोपर – मानखुर्द लिंक रोड उड्डाणपुलाच्या नामकरणाबाबत सत्ताधारी शिवसेना आणि भाजप यांच्यात निर्माण झालेला वाद गुरुवारी स्थापत्य समिती (उपनगरे)च्या बैठकीत अखेर संपुष्टात आला आहे. या उड्डाणपुलाला ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’ असे नाव देण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

या संदर्भांतील माहिती स्थापत्य समिती अध्यक्ष (उपनगरे) स्वप्निल टेंबवलकर यांनी दिली आहे.

या उड्डाणपुलाला ‘ छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’ (Chhatrapati Shivaji Maharaj Flyover) असे नाव देण्याची मागणी शिवसेना नगरसेविका वैशाली शेवाळे यांनी जानेवारी २०२१ रोजी पत्राद्वारे केली होती. तर भाजपचे नगरसेवक व खासदार मनोज कोटक (BJP MP Manoj Kotak) यांनीही, या उड्डाणपुलाला ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’ असे नाव देण्याची मागणी ९ डिसेंबर २०२० रोजी पत्राद्वारे केली होती.

त्याचप्रमाणे, शिवसेना खासदार राहुल शेवाळे (Shiv Sena MP Rahul Shewale) यांनी १० जून २०२१ रोजी या उड्डाणपुलास ‘ख्वाजा गरीब नवाज मोईनुद्दीन चिश्ती अजमेरी’ असे नाव देण्याची मागणी केली होती. तर समाजवादी पक्षाचे आमदार, गटनेते व नगरसेवक रईस शेख यांनी, याच उड्डाणपुलास ‘सुल्तानुल हिन्द ख्वाजा गरीब नवाज’ (र.अ) असे नाव देण्याची मागणी केली होती व त्याबाबतचा विषय २३ जुलै २०२१ रोजी सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत चर्चेला होता.

तत्पूर्वी, हा विषय १८ जानेवारी २०२१ रोजीच्या स्थापत्य समिती (उपनगरे) कार्यक्रम पत्रिकेवर आला असतानाही हा विषय आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात आला. दरम्यान, राहुल शेवाळे यांनी केलेल्या मागणीला भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी विरोध दर्शवला होता. त्यामुळे शिवसेना – भाजपात वादळ उठले होते. अखेर खासदार राहुल शेवाळे यांनी, नगरसेविका वैशाली शेवाळे यांनी या उड्डाणपुलाला ‘ छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’ असे नाव देण्याबाबत केलेल्या मागणीची माहिती नव्हती, असे कारण देत सारवासारव केली.

नंतर हाच विषय २८ जून रोजी स्थापत्य समितीच्या बैठकीत आला असता त्यावर पालिका आयुक्त यांनी, उड्डाणपुलाचे काम प्रलंबित असल्याने त्याच्या नामकरणाबाबत आताच निर्णय घेणे अशक्य असल्याचे सांगत हात वर केले.

त्यावेळी, भाजपचे नगरसेवक या बैठकीत आक्रमक झाले व त्यांनी उपसूचना मांडून उड्डाणपुलाला ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांचेच नाव देण्याची मागणी लावून धरली. मात्र प्रशासनाचा अभिप्राय नाकरात्मक असल्याचे कारण देत समिती अध्यक्ष स्वप्निल टेंबवलकर यांनी विषय राखून ठेवला होता.

त्यावेळी भाजप नगरसेवकांनी स्थापत्य समितीच्या बैठकीत गदारोळ घातला होता. तसेच, सत्ताधारी शिवसेना व पालिका प्रशासन यांना दोष देत आणि घोषणाबाजी करीत सभात्याग केला होता. त्यामुळे ती बैठक चांगलीच गाजली होती.

दरम्यान, स्थापत्य समिती (उपनगरे) अध्यक्ष स्वप्नील टेम्बवलकर यांनी २ जुलै रोजी या उड्डाणपुलाच्या कामाच्या ठिकाणी भेट देऊन पुलाच्या कामाची पाहणी करून सखोल माहिती घेतली होती. या पुलाचे काम हे २५ जुलैपर्यन्त पूर्ण होणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.

या उड्डाणपुलाला ‘छत्रपती शिवाजी महाराज’यांचेच नाव देण्यात येणार असल्याचे त्यांनी त्यावेळी जाहीर केले होते. त्याप्रमाणे आज म्हणजे गुरुवारी स्थापत्य समिती ( उपनगरे) ची बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेच्या नगरसेविका निधी शिंदे यांनी उपसूचना मांडली व अखेर त्यास सर्वपक्षीयांनी पाठींबा दिल्यानंतर अखेर ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांचेच नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here