गार्डन, मैदाने, मोकळ्या जागांचाही होणार वापर

मुंबई: मुंबईत वाढत्या वाहनांच्या गर्दीमुळे निर्माण झालेली पार्किंगची समस्या मार्गी लावण्यासाठी पालिकेने बेस्ट डेपोच्या जागेत वाहन पार्किंग सुविधा सुरू केली आहे. मात्र तरीही पार्किंग समस्या सुटलेली नाही. त्यामुळे आता बेस्टच्या डेपोच्या मोकळ्या जागेत दोन- तीन स्तरीय वाहन पार्किंग उभारण्यास आर्थिक भांडवल व प्रशासकीय बाबींची पूर्तता झाल्यास मुंबई महापालिका व बेस्ट प्रशासन अनुकूल आहे.

तसेच, मुंबईतील मोकळ्या जागा, मैदाने, जिमखाने, गार्डन, रस्ते, सार्वजनिक मोकळ्या जागांच्या ठिकाणी वाहन पार्किंग सुविधा बहाल करण्यासाठी पालिकेने सकारात्मकता दाखवत कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे आता आगामी काळात मुंबईतील वाहन पार्किंगची समस्या कायमस्वरूपी मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भाजपच्या नगरसेविका सुरेखा पाटील (भाजप वॉर्ड क्र.२७) यांनी, मुंबईत वाहनांची वाढती संख्या पाहता त्या तुलनेत पार्किंग सुविधा अपुरी पडत असल्याचे म्हटले आहे. सध्या अस्तित्वात असलेली पार्किंग सुविधा ही पुरेशी नसल्याने वाहन धारक, चालक हे रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी, इमारतीच्या आवारात, मिळेल त्या ठिकाणी वाहन पार्क करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन त्याचा सर्वांनाच त्रास होतो.

अगदी आपत्कालीन परिस्थितीत म्हणजे कुठे आग लागली, इमारत , घर दुर्घटना झाल्यास त्या ठिकाणी मदत व बचावकार्य करण्यासाठी घटनास्थळी जाणाऱ्या अग्निशमन दलाच्या वाहनांना आणि रुग्णवाहिकेला मार्ग काढत जाणे कठीण होते. त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे वाहन पार्किंगसाठी नवीन पर्याय उपलब्ध करणे अत्यंत गरजेचे आहे. मुंबईच्या विकास आराखड्यात वाहन पार्किंग बाबत व्यवस्था करण्यात आली आहे.

मात्र त्याची अंमलबजावणी होईल तेव्हा ती सुविधा उपलब्ध होईल. सध्या बेस्ट उपक्रमाचे शहर व उपनगरात अनेक बस डेपो असून त्या ठिकाणी ‘भुयारी पार्किंग’ ची सुविधा उपलब्ध करून दिल्यास वाहन पार्किंगची समस्या मार्गी लागण्यास मदत होईल, अशी मागणी नगरसेविका सुरेखा पाटील यांनी २५ जुलै २०१९ रोजी ठरावाच्या सुचनेद्वारे केली होती.

त्यावर पालिका आयुक्त इकबाल चहल व बेस्ट प्रशासन यांनी, प्रथमतः बेस्टच्या सध्याच्या स्थितीत त्याबाबत अंमलबजावणी करणे कठीण असल्याचे म्हटले होते ; मात्र जर आर्थिक भांडवल व प्रशासकीय बाबींची पूर्तता झाल्यास बेस्ट डेपोच्या जागेत भुयारी पार्किंग सुविधा देणे शक्य होईल, असे म्हटले आहे.

सध्या बेस्टच्या डेपोमध्ये खासगी बस, वाहने यांना सशुल्क पार्किंग व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे.

मात्र बेस्टच्या स्वतःच्या ३ हजार बसगाड्या असून भविष्यात पहिल्या टप्प्यात हा बसताफा ६ हजार ३३७ पर्यन्त व दुसऱ्या टप्प्यात हा बसताफा तब्बल १० हजार बससंख्येपर्यन्त जाण्याची शक्यता असून त्यावेळी मात्र बेस्टला स्वतःची वाहने पार्क करायला जागा अपुरी पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

यास्तव, बस डेपोच्या जागेत भुयारी बस पार्किंग व्यवस्था उपलब्ध केल्यास वाहन पार्किंगची समस्या काही प्रमाणात मार्गी लागण्यास मोठी मदतच होणार आहे.

मात्र या भुयारी पार्किंगसाठी सल्लागार नेमून त्याचे मत विचारात घ्यावे लागणार असल्याचेही पालिकेने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here