स्वच्छ मुख अभियानाचे सचिन तेंडुलकर सदिच्छादूत

Twitter : @maharashtracity

मुंबई: भारत हा तरुणांचा देश असला तरी किती तरुण निरोगी जीवन जगतात हे महत्त्वाचे आहे. जीवन जगतांना तंदुरुस्त दिसणे आणि निरोगी असणे या भिन्न गोष्टी आहेत. निरोगी जीवन जगणे प्रत्येकाच्या हातात आहे. यासाठी मी जनजागृती करणार आहे. स्वतःचे मुख स्वच्छ ठेवा, आरोग्यदायी जीवन जगा, आयुष्याची मॅच जिंकणे स्वतःच्या हातात आहे. राज्य शासनाने स्वच्छ मुख अभियान सुरू करून जनजागृतीच्या पहिल्या इनिंगला सुरुवात केली आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त योगदान देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे विधान विश्वविख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी केले. राज्य सरकारच्या ’स्वच्छ मुख अभियाना‘चे ब्रँड अम्बॅसॅडर म्हणजेच सदिच्छादूत म्हणून विश्वविख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्याशी करार करण्यात आला आहे. या कार्यक्रमादरम्यान तेंडुलकर बोलत होते.

दरम्यान, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्यावतीने सदिच्छादूत सामंजस्य करारावर मंगळवारी स्वाक्षरी कार्यक्रम मुंबईत झाला. तेंडुलकर यांच्या आवाहनाला तरुणांसह सर्व स्तरातील नागरिकांमध्ये जनजागृती होवून अभियान अधिक यशस्वी होण्यास मदत होईल, अशी आशा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. फडणवीस पुढे म्हणाले की, मौखिक आजारांचा प्रादूर्भाव वाढत असून शाळेतील मुलांमध्येही तंबाखू, गुटखा, खर्रा अशा पदार्थांच्या सेवनामुळे कँन्सर रोग आढळत आहे. ही चिंतेची बाब असून यासाठी जनजागृती महत्त्वाची आहे. प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी आजपर्यंत कधीच तंबाखूजन्य पदार्थांची जाहिरात केली नाही. आरोग्यासाठी तडजोड न करणाऱ्या अशा जगप्रसिद्ध व्यक्तींनी सदिच्छादूत म्हणून या उपक्रमात सहभाग घेतला आहे. यामुळे येणारी पिढी व्यसनाचे दुष्परिणाम ओळखून, समजावून घेवून स्वच्छ मुख ठेवण्यासाठी सावधगिरी बाळगेल अशी आशा फडणवीस यांनी व्यक्त केली. तर सचिन तेंडुलकर यांनी या अभियानाचे सदिच्छादूत पद स्वीकारल्यामुळे या अभियानाची सर्वदूर व्याप्ती पसरुन चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास गिरीश महाजन महाजन यांनी व्यक्त केला. राज्यात वाढत्या मौखिक आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासनाने या वर्षापासून महाराष्ट्र मौखिक आरोग्य अभियान म्हणजेच स्वच्छ मुख अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

यावेळी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य मंत्री गिरीश महाजन, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या सचिव अश्विनी जोशी, आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, उपसंचालक डॉ.अजय चंदनवाले आदींसह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here