जनतेच्या तक्रारींसाठी वॉररूम
महापालिकेचे मुंबईकरांना आवाहन
@maharashtracity
मुंबई: मुंबई महापालिकेची (BMC) मुदत संपल्याने महापौर, उप महापौर, विविध समित्यांच्या अध्यक्षपदाचा कालावधीही संपुष्टात आला आहे. त्यामुळे आता पालिकेची निवडणूक होऊन नवीन महापौर, समिती अध्यक्ष यांची नेमणूक होईपर्यंत पालिकेचा कारभार पाहण्यासाठी राज्य शासनाने प्रशासक (Administrator) म्हणून पालिका आयुक्त इकबाल चहल (BMC Commissioner IS Chahal) यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे.
आयुक्तांनी आज सर्वसंबंधीत खात्याच्या अधिकाऱ्यांची पहिलीच आढावा बैठक घेतली. तसेच, नागरिकांना पाणीपुरवठा, नालेसफाई, कचरा, रस्ते समस्या आदींबाबत प्रशासक कालावधीत तक्रारी करण्यासाठी पालिकेने वॉररूमची (War room) व्यवस्था केली आहे. नागरिकांना कोणतीही तक्रार असल्यास चॅट बॉट, सोशल मीडिया, विभागनिहाय वॉर्ड वॉर रूम येथे तक्रारी करता येणार आहेत.
यापूर्वी, नागरिक स्थानिक नगरसेवक, शाखा, पक्ष कार्यालये आदी ठिकाणी, पालिकेकडे वार्डात नागरी समस्यांबाबत तक्रारी करीत असत. आता नगरसेवकांचा कालावधी संपुष्टात आला आहे. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी पालिकेने वरीलप्रमाणे व्यवस्था केली आहे.
प्रशासक कालावधीत पालिकेच्या वॉर्ड वॉर रूममध्ये नोंदविण्यात येणाऱ्या नागरी तक्रारींवर संबंधित वॉर्डचे सहाय्यक आयुक्त दिवसातून दोन वेळा आढावा घेऊन त्या तक्रारी मार्गी लावणार आहेत.
प्रस्तावासाठी समिती
मुंबई महापालिकेची मुदत संपण्यापूर्वीपर्यंत सर्व प्रस्ताव वैधानिक आणि विशेष समित्यांमध्ये मंजूर केले जात होते. मात्र आता पालिकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्व प्रस्ताव मंजूर करण्याचे अधिकार प्रशासक म्हणून पालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत.
कोणताही प्रस्ताव चुकीच्या पद्धतीने मंजूर केला जाऊ नये, त्यावर कोणी टीका करू नये यासाठी पालिका अधिकाऱ्यांची एक समिती नियुक्त करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. त्या समितीच्या पुढे सर्व प्रस्ताव सादर करून नंतर त्यांना मंजुरी द्यावी. तसेच हे मंजूर करण्यात आलेले सर्व प्रस्ताव निवडणूक झाल्यावर पालिका अस्तित्वात आल्यावर स्थायी आणि सभागृहापुढे कार्योत्तर मंजुरीसाठी आणावेत, असा विचार सुरू असल्याची माहितीही प्रशासकीय सूत्रांकडून मिळाली आहे.