By Sadanand Khopkar

Twitter: @maharashtracity

मुंबई: स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान हा देशद्रोह आहे, हे कदापि सहन करणार नाही, या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या संतप्त भावना विधानसभेत व्यक्त केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगात देशाची कीर्ती गाजविली असेही ते म्हणाले.

अत्यंत तीव्र नापसंती व्यक्त करताना मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, आमच्या गटातील नेत्यांना गद्दार संबोधले जाते, स्वातंत्र्यवीर सावकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह बोलून त्यांचा सतत अवमान केला जातो,  ते आम्ही कदापि सहन करणार नाही, आम्हाला खोके म्हणणे, मिंधे गट म्हणणे कोणत्या आचारसंहितेत बसते, असा सवालही त्यांनी केला. 

मुख्यमंत्री  म्हणाले, आमच्या आमदारांच्या विरोधात आठ महिने आंदोलन करून अवमानकारक घोषणा दिल्या जात आहेत. ते आम्ही सहन करत आहोत. त्यामुळे कारवाई करायची असेल, तर असा अवमान करणार्‍या सर्वांवर केली पाहिजे. आम्ही बोलत नाही याचा अर्थ बोलू शकत नाही असा होत नाही. सभागृहाबाहेर राष्ट्रीय नेत्यांच्या विरोधात कुणीही बोलले, तर सर्वांनी आक्षेप घ्यायला हवा. 

पंतप्रधान मोदी यांच्या विषयी ते म्हणाले, मातेचे निधन झाल्यावर अंत्यसंस्कार करून ते लगेच कर्तव्यावर रुजू झाले. जी २० चे अध्यक्षपद भारताला मिळाल्यानंतरच लगेच लोकशाही धोक्यात आल्याचा कांगावा केला जातो. लोकशाही धोक्यात असेल, तर काँग्रेसने ‘भारत जोडो’ यात्रा कशी काढली ? आम्ही माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी याचा जसा मान राखतो, त्याप्रमाणे तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मान राखायला हवा, असे आवाहनही त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here