By Sadanand Khopkar

Twitter: @maharashtracity

मुंबई: सत्ताधारी आमदारांमुळे राज्याची कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली असून गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. नैसर्गिक आपत्ती आणि शेतमाल यांना हमीभाव मिळत नसल्याने राज्यातील शेतकरी त्रस्त आहे. हाताला काम नसल्याने तरुण बेरोजगार आहे. महागाईने सामान्य जनता त्रस्त आहे. राज्यातल्या महिला आणि मुली सुरक्षित नाहीत, अशी जोरदार टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना केली.

विधानसभा नियम २९२ अन्वये विरोधी पक्षनेते पवार बोलत होते. उत्तर प्रदेशातील कायद्याच्या धर्तीवर ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा राज्यात केला जाणार असल्याची वक्तव्ये काही लोकप्रतिनिधी करतात. मात्र, धार्मिक द्वेष पसरला जाणार नाही, जातीय सलोखा बिघडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. यासाठी सर्वांना विश्‍वासात घेऊन निर्णय घेतला पाहिजे असे ते म्हणाले. 

सरकारने घटनाविरोधी ‘आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती’ स्थापन केली हा जनतेचा मूलभूत हक्क डावलण्याचा हा प्रकार आहे. लोकांच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा कोणालाही अधिकार नाही, असेही प्रतिपादन अजित पवार यांनी  केले.

ते पुढे  म्हणाले, राज्याची कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे. दिवसा-ढवळ्या तलवारी, कोयते नाचवले जात आहेत.  गोळीबारात माणसे मरत आहेत. राजकारणासाठी विरोधकांची मुस्कटदाबी चालू आहे. राज्यात केवळ सत्ताधारीच सुरक्षित आहेत. सरकारकडून कणखर भूमिका न घेता केवळ सत्ता टिकवण्यासाठी तडजोडी चालू आहेत, असे आरोपही पवार यांनी यावेळी केला.

अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होते आहे याकडेही पवार यांनी लक्ष वेधले. महाराष्ट्रातून प्रतिदिन ३८ महिला- मुली बेपत्ता होत आहेत, ही गंभीर गोष्ट आहे. मुंबईतच  महिला अत्याचारांच्या वर्षभरात ६ हजार १३३ गुन्हे नोंद झाले. ६१४ अल्पवयीन मुली आणि ९८४ महिला विकृत वासनेच्या शिकार झाल्या. १ हजार ५९८ पैकी ९१२ गुन्हेच उघडकीस आले. ६८६ प्रकरणांत, तर आरोपीही सापडले नाहीत. १ हजार १६४ मुलींचे अपहरण झाले. त्यापैकी १ हजार ४७ मुली सापडल्या. ११७ मुली अजून पोलिसांना सापडलेल्या नाहीत अशी आकडेवारी त्यांनी दिली. शाळेतील मुली आणि महिला यांच्यावर अत्याचार होत आहेत. या  घटनांतील आरोपींना जलदगती न्यायालयासमोर उपस्थित करून फाशीची शिक्षा व्हावी. शक्ती कायद्याला अजून केंद्र सरकारची संमती लवकरात लवकर मिळावी, अशी मागणीही अजित पवार यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here