Twitter: @maharashtracity
मुंबई: रिथ्विक प्रोजेक्ट्स प्रा. लि. व महाराष्ट्र शासन यांच्यात आज ८१६० कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातील आवंडी, लतागाव या ठिकाणी हा प्रकल्प होणार असून त्याद्वारे सुमारे पाच हजार जणांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे.
यावेळी उद्योग विभागाचे सचिव हर्षदीप कांबळे, विकास आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह, कंपनीचे कार्यकारी संचालक सी. एम. राजेश, संचालक के. एस. प्रसाद आदी उपस्थित होते.
रिथ्विक प्रोजेक्टस कंपनी पायाभूत सुविधा निर्मिती क्षेत्रात काम करते. या शिवाय जलऊर्जा प्रकल्प, काँक्रीट धरणे, बॅरेजेस, स्पीलवेज, बोगदे, नाला व बंधारे, राजमार्ग तथा उड्डाणपूल, इमारत बांधकाम, पाणीपुरवठा प्रकल्प तसेच खनिकर्म प्रकल्पात कार्यान्वित आहे.
कमी पाण्यात उर्जा निर्मितीसाठी हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात हा प्रकल्प होत असून पुढील ४ ते ५ वर्षात हा प्रकल्प कार्यान्वयित होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.