प्रदेश काँग्रेसचा भाजपा वर आरोप

By Anant Nalavade

Twitter : @nalavadeanant

मुंबई: महाराष्ट्रात मागील दोन-अडीच महिन्यात १० ठिकाणी दंगली घडवण्यात आल्या. या दंगलीमागे सत्ताधारी भाजपचा (BJP behind riots) हात असून महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी या दंगली घडवल्या जात आहे. सत्तेच्या जोरावर महाराष्ट्राचा मणिपूर (Manipur) करण्याचा भाजपाचा कुटील डाव आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (MPCC President Nana Patole) यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला.

पटोले म्हणाले की, राज्यात अमरावती, अकोला, शेगाव, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूरसह १० ठिकाणी दंगली घडवण्यात आल्या. महाराष्ट्रात शाहु, फुले, आंबेडकर यांचा विचार खोलवर रुजलेला आहे म्हणून भाजपाचा हा कुटील डाव यशस्वी होऊ शकला नाही. राजर्षी शाहू महाराज यांच्या कोल्हापुरातही भाजपाने धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण भाजपाचे षडयंत्र जनता ओळखून आहे. त्यामुळे हा डावही फसला. राज्यातील जनतेने संयम पाळला आणि सामाजिक सौहार्द हा येथील मुलधर्म असल्याने अशा षडयंत्राला जनता बळ पडत नाही. पक्षाने राज्यातील कायदा सुव्यवस्था संदर्भात (law and order) पोलीस महासंचालक व राज्यपाल यांची भेट घेऊन चर्चा केली, पण कारवाईबाबत काहीच ठोस झालेले नसल्याचेही पटोले यांनी निदर्शनास आणून दिले.

महागाई, बेरोजगारीसारख्या (unemployment) महत्वाच्या समस्या उभ्या असताना भाजप सरकार त्यावर काहीच बोलत नाही व जनतेला दिलासा देणारे निर्णयही घेत नाही. शेतकऱ्यांवर (farmers) आस्मानी, सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे, सरकार केवळ मदतीची घोषणा करते पण शेतकऱ्यांपर्यंत सरकारी मदत पोहचतच नाही. परवाच मुख्यमंत्र्यांनी १५०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली पण आधी जाहीर केलेली मदत कुठे गेली? शेतकऱ्यांना ती मिळालीच नाही. हे सर्व प्रश्न असल्याने सरकार त्यावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहे, असाही आरोप पटोले यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here