अनेक अडचणींवर मात करून जुळ्यांना जन्म

Twitter : @maharashtracity

मुंबई: शीतल (नाव बदलण्यात आले आहे) ३७ वर्षीय महिलेने अनेक वैद्यकीय अडचणींवर मात करून मातृत्व मिळवण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. शीतल यांनी स्थूलपणा, ७०.६ बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) आणि गर्भारपणात असलेले तब्बल १६३ किलोचे वजन अशा अडचणींवर मात करुन आयव्हीएफमार्फत त्यांनी जुळ्या मुलींना कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये जन्म दिला आहे. यामुळे वजनदार महिलांमध्ये आई होण्याची आशा त्यांच्या उदाहरणातून जागरुक होईल असे तज्ज्ञ सांगत आहेत.

शीतल यांनी सांगितले की, मला स्थूलपणामुळे बॉडी शेमिंगचा खूप त्रास सहन करावा लागला. लग्नानंतर एक दशकभर मी मातृत्वाचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न करत होते. वजन जास्त असून देखील मला वाटत होते की, मला फक्त थायरॉईड आहे आणि स्थूलपणाशी संबंधित कोणतीही इतर व्याधी गर्भवती राहण्याच्या माझ्या क्षमतेच्या आड येत नव्हती. तसेच स्थूल महिलांना गर्भपात, मुदतपूर्व प्रसूती, गर्भावस्थेमध्ये होणारा मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासारख्या गुंतागुंती होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे त्यांची गर्भधारणा खूप जास्त जोखमीची मानली जाते. मात्र शीतल यांच्या आयव्हीएफ स्पेशालिस्टने त्यांना कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबईमध्ये जाण्याचा सल्ला दिला. अनेक धोके असून देखील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल मधील गायनॅकोलॉजिस्ट, ऑब्स्टट्रिशियन आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. रेणुका बोरिसा यांच्या नेतृत्वाखालील समर्पित हेल्थकेयर टीमने शीतल यांच्याकडे अतिशय बारकाईने लक्ष दिले.

सिझेरियन सेक्शनमार्फत प्रसूती करण्यात आली. जुळ्यांची डिलिव्हरी करवणाऱ्या डॉ बोरिसा यांनी सांगितले, स्थूलपणाची व्याधी असलेल्या महिलेच्या गर्भारपणावर खूप बारकाईने लक्ष ठेवावे लागते. ऑपरेशन थिएटर आणि मॉनिटरिंगसाठी लागणारी उपकरणे इत्यादी अनेक गोष्टी सदैव तयार ठेवाव्या लागतात. तसेच मुदतपूर्व प्रसूती होऊ नये यासाठी गर्भाशयाच्या तोंडाला टाके घालण्याची सर्व्हायकल सेर्कलजची प्रक्रिया आणि सिझेरियन सेक्शनमध्ये पोटाच्या महत्त्वाच्या टिश्यूमधून नेव्हिगेट करणे यांचा यामध्ये समावेश होता. शीतल यांच्या प्रकरणात अनेक आव्हाने होती, त्यासाठी वैद्यकीय तज्ञांनी लक्ष घालणे अत्यावश्यक होते.

यावर कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल संचालक डॉ. बिपीन चेवले यांनी सांगितले, या ठिकाणी रुग्णांना अतुलनीय देखभाल पुरवण्यासाठी प्रयत्न केला जातो. केसमध्ये कितीही गुंतागुंत असली तरी हार मानत नाही. अशा दुर्मिळ केसेस हाताळण्यासाठी विशेष कौशल्ये व संसाधने आवश्यक असतात त्यामुळे खूपच कमी रुग्णालये ते करू शकतात. अनेक विविध प्रकारच्या विशेष सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करवून देण्याची या हॉस्पिटलची क्षमता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here