अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीसाठी शासनाचा दिलासा

Twitter: @maharashtracity

अवकाळी पावसाने शेत पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने आज मोठा दिलासा दिला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत अशा शेतकऱ्यांसाठी १५०० कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला. 

गेल्या काही महिन्यात सातत्याने कोसळणाऱ्या अवकाळी पावसाने राज्यातील सर्वच भागातील शेतकऱ्यांचे हाता तोंडाशी आलेल्या पिकाचे नुकसान झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या नुकसानीची पाहणी करतांना राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी (एन डी आर एफ) चे निकष शिथिल करून मद जाहीर केली जाईल, असे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने आज झालेल्या  मंत्रीमंडळाच्या बैठकीत 1500 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

शेतकऱ्यांना मदत देण्यात येत नसल्याने राज्य सरकार विरोधी पक्षाच्या रडारवर होते. विरोधी पक्षाने राज्य सरकार विरोधात आंदोलनदेखील केले होते. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी अशा मागणी करून काँग्रेसने राज्यपाल यांना निवेदन दिले होते.

कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा

ग्रामविकास विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी देखील राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन 16 हजार रुपये करण्यात आले आहे. ग्रामविकास विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून मानधन वाढीसाठी राज्य सरकार विरोधात अनेकदा आंदोलन करण्यात आले होते. मागील आंदोलनादरम्यान आंदोलकांना राज्य सरकारने आश्वासन देऊन आंदोलन स्थगित केले होते. त्यानंतर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला. 

मंत्रिमंडळ बैठकीतील अन्य निर्णय

● अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्यात केंद्राप्रमाणे सुधारणा. 

● पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती वाढविली. 

● लातूर येथे पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करणार

● पुणे येथे ४ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करणार 

●  अतिरिक्त न्यायालये व जलदगती न्यायालयांना दोन वर्षे मुदतवाढ

●  मानसिक आजारमुक्त व्यक्तींकरिता पुनर्वसन गृहे योजना 

● स्वातंत्र्य सैनिकांना घरांसाठी जमीन देण्यासाठी कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादा वाढविली

● चिमूर आणि शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here