@maharashtracity

धुळे: मृग नक्षत्र संपत आले तरी धुळे जिल्ह्यात अल्प प्रमाणात पाऊस झालेला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांचीही चिंता वाढलेली आहे. दमदार पाऊस नसल्याने धुळे जिल्ह्यात आत्तापर्यंत जेमतेम ११ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मृग नक्षत्र कोरडे गेल्याने आता शेतकर्‍यांच्या आर्द्रा नक्षत्राकडून अपेक्षा वाढल्या आहे.

धुळे जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान ५४८.४० मि.मी. एवढे आहे. यावर्षी सरासरी एवढा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्याने, शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झालेल्या होत्या. त्यातच मान्सूनपूर्व पावसानेही जोरदार हजेरी लावली होती.

आतापर्यंत झालेल्या पावसामुळे खरीप हंगामाच्या कामांनाही गती आली होती. जून महिन्यात जिल्ह्यात सरासरी १२१.५५ मि.मी. पाऊस होणे अपेक्षित असताना जिल्ह्यात २१ जून अखेरपर्यंत ५८ मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे. यात धुळे तालुक्यात ८५.७, साक्री तालुक्यात ५२.७, शिरपूरमध्ये सर्वाधिक कमी २६.५, तर शिंदखेडा तालुक्यात ५५.७ मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे. गेल्या वर्षी २१ जूनअखेरपर्यंत १७२.५ मि.मी. पावसाची नोंद झालेली होती. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी निम्माही पाऊस झालेला नाही.

अपेक्षित पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेसा ओलावा तयार झालेला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी अद्याप पेरण्या केलेल्या नाही. दोन दिवसांपूर्वी आर्द्रा नक्षत्राला प्रारंभ झाला आहे. आता तरी चांगला पाऊस होईल, अशी अपेक्षा आहे.

जिल्ह्यात यंदा ४ लाख १६ हजार ९७९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे आत्तापर्यंत केवळ ११ टक्के क्षेत्रावर म्हणजेच ४६ हजार ३३३ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहे. त्यातही कापसाची सर्वाधिक लागवड झाली आहे. बागायदार शेतकर्‍यांनी पूर्वहंगामी कपाशीची लागवड केली आहे. आतापर्यंत २० टक्के क्षेत्रावर कापूस लावण्यात आला आहे. जिल्ह्यात यंदा २ लाख २३ हजार ९४५ हेक्टरवर कपाशीची लागवड होण्याचा अंदाज आहे. आत्तापर्यंत ४४ हजार ५५ हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here