@maharashtracity

मुंबई: मुंबई महापालिका निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या असताना मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी प्रभाग पुनर्रचनेबाबत केलेली विधाने म्हणजे निवडणुकीत होणारा संभाव्य पराभव ओळखून कारणे देण्याचा प्रकार आहे, असे टीकास्त्र मुंबई भाजपा प्रभारी आणि आमदार अतुल भातखळकर यांनी सोडले आहे.

भाई जगताप यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परीषदेत प्रभाग पुनर्रचनेवरून तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले होते. त्याचा समाचार घेताना भातखळकर यांनी काँग्रेसवर तुफानी टीका केली.

राज्यात शिवसेनेसोबत सत्तेवर असलेला काँग्रेस पक्ष महापालिकेत मात्र स्वबळाचे हाकारे देत आहे. नालेसफाईत शंभर कोटीचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. नालेसफाईचे टेंडर काढताना स्टँडींगमध्ये टक्केवारीचे अंडरस्टॅण्डींग करायचे आणि बाहेर येऊन भ्रष्टाचाराची बोंब ठोकायची ही धूळफेक लोकांच्या लक्षात आलेली आहे. टक्केवारीतला पुरेसा वाटा मिळाला नसल्यामुळे काँग्रेसची तगमग होत असावी बहुधा, असा टोला भातखळकरांनी लगावला.

राज्याच्या सत्तेत एकत्र मलई ओरपणारा काँग्रेस पक्ष महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतो आहे. परंतु विश्वासघाताने राज्यात मिळवलेल्या सत्तेचा जाब लोक महापालिकेच्या निवडणुकांमध्ये विचारल्याशिवाय राहणार नाही या भीतीने काँग्रेसला कापरे भरले आहे. त्यातून भाई जगताप आता देवेंद्र फडणवीस यांच्या काळात झालेल्या प्रभाग पुनर्रचनेवर ठपका ठेवत आहेत, असे भातखळकर म्हणाले.

भाजपाने चुकीच्या पद्धतीने प्रभागांची पुनर्रचना केल्याचा आरोप भाई जगताप यांनी केला आहे. परंतु पुनर्रचना कोणताही राजकीय पक्ष करीत नसून राज्य निवडणूक आयोग करतो, एवढे सामान्य नागरीक शास्त्र, जगताप यांना ठाऊक नाही याचे आश्चर्य वाटते, असा टोलाही भातखळकर यांनी लगावला.

‘भाजपाने गेल्यावेळी जिंकलेले प्रभाग या निवडणुकीत टीकवून दाखवा’, असे आव्हान जगताप यांनी दिले आहे, ‘राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत युती करण्याचे सुतोवाच केले आहे, काँग्रेसनेही त्यांच्यासोबत हातमिळवणी करावी आणि महापालिकेतील सत्ता टीकवून दाखवावी’, असे खुले आव्हान भातखळकर यांनी दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here